वकील, पक्षकारांना मिळेना जागा पुरेशी आसनव्यवस्था नसल्याने न्यायालयात गैरसोय

वकील, पक्षकारांना मिळेना जागा पुरेशी आसनव्यवस्था नसल्याने न्यायालयात गैरसोय

पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामधील जुन्या आणि नव्या इमारतीमध्ये पुरेशी आसनव्यवस्था नाही. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांसह वकील वर्गाची गैरसोय होत आहे. बहुतांश ठिकाणी न्यायालयीन कक्षांच्या बाहेर असलेली आसनव्यवस्था मोडकळीस आली आहे. पुरेशी आसनव्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे वकिलांसह पक्षकारांना तासन् तास न्यायालयाच्या कक्षेबाहेर उभे राहावे लागत आहे. न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने दररोज हजारो वकील, पक्षकार येत असतात. कोरोनाकाळात न्यायालयात फक्त महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू असल्यामुळे वकील, पक्षकारांची संख्या घटली होती.

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर न्यायालये पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, न्यायालयात येणार्‍या वकील, पक्षकारांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खटल्याच्या निमित्ताने पुकारलेल्या वकील, पक्षकारांनाच न्यायालयीन कक्षात प्रवेश दिला जातो. त्यामुळे इतर वकील, पक्षकारांना पुकारेपर्यंत न्यायालयीन कक्षाच्या बाहेर वाट पाहत थांबावे लागते. न्यायालयातील जुन्या आणि नव्या इमारतीमध्ये पुरेशी आसनव्यवस्था नसल्याने वकील, पक्षकारांना त्रास सहन करावा लागत आहे. न्यायालयाच्या जुन्या आणि नव्या इमारतीमध्ये काही जुनी लाकडी बाकडी ठेवण्यात आलेली आहेत. मात्र, ही बाकडी तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर लोखंडी बाकडीदेखील तुटलेली आहेत.

कामकाज पूर्ववत झाल्याने पुरेशी आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यासह मोडकळीस आलेल्या साहित्यांची डागडुजी करण्याची गरज आहे. जेणेकरून न्यायालयाने कामकाजासाठी आलेल्या वकील वर्गासह पक्षकारांची गैरसोय होणार नाही. प्रशासनाने न्यायालयात चांगल्या प्रकारची आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

                                      – अ‍ॅड. आनंद धोत्रे, माजी सदस्य, पुणे बार असोसिएशन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news