येरवडा; पुढारी वृत्तसेवा: नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील लोहगाव, खराडी परिसरात कचरा कंटेनर वारंवार नादुरुस्त होत आहेत. तसेच, कचरा हस्तांतर केंद्रात गाड्या लवकर खाली होत नाहीत. यामुळे परिसरात ठिकठिकाणी कचरा असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे कचरा वाहतूक करणार्या वाहनांची संख्या वाढवण्याची मागणी माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह नागरिकांनी केली आहे. उपनगरात कचर्याची गंभीर समस्या आहे. कचरा वाहतूक करणार्या कंटेनर गाड्या जुन्या असल्याने वारंवार बंद पडत आहेत. परिणामी, कचरा पीकअप पॉइंटवर कचरा साचून राहत आहे.
नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दोन-तीन दिवस कचरा साचून राहत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, गाड्यांची संख्या कमी आहे. याशिवाय कचरा हस्तांतरण केंद्रावर गाड्या लवकर खाली होत नसल्याची माहिती मिळाली. पठारे म्हणाले, "खराडी परिसरातील कचरा हा काळभैरवनाथ ट्रस्टच्या वतीने टेम्पो लावून अल्प दरात उचलला जातो. मात्र, कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा भरून घेऊन जाण्यासाठी कंटेनर मिळत नसल्याने टेम्पो तसेच भरून उभे राहतात. परिणामी, दुर्गंधी येत असून डासांचे प्रमाण वाढले आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण मतदारसंघात आहे. ही समस्या सुटली नाही, तर आंदोलन करण्यात येईल."
आठवडे बाजारात दुर्गंधीचा त्रास
लोहगावमध्ये बाजारतळात कचरा रॅम्प आहे. याठिकाणी अनेक दिवसांपासूनचा कचरा साचून आहे. रविवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारात येणार्या नागरिकांना साचलेल्या कचर्याची दुर्गंधी सहन करावी लागत आहे. गाड्या कमी असल्याने तसेच त्या लवकर खाली होऊन येत नसल्याने कचरा साचत असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.
नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कचरा गाड्या नादुरुस्त झाल्या होत्या. त्या दुरुस्त करून मिळाल्या आहेत. गाड्या जुन्या असल्याने त्या वारंवार नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नवीन मिळण्यासाठी वाहन विभागाला पत्र दिले आहे. कचरा हस्तांतर केंद्रावर गाड्या रिकाम्या करताना काही अडचणी आल्यास त्या तातडीने सोडविल्या जात आहेत.
– आशा राऊत, प्रमुख, घनकचरा विभाग