

लोणावळा : लोणावळा शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवार पासून पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासांत 130 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी रात्रभर पावसाने संततधार कायम ठेवल्यानंतर मंगळवारी सकाळी पावसाने लोणावळा शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या.
रायवूड भागातील ट्रायोज मॉल समोरील रस्त्याला तर अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. लोणावळा शहरात मंगळवारी सकाळपर्यंत एकूण 3190 मिमी (125.59 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आतापर्यंत 3367 मिमी (132.56 इंच) पाऊस नोंदविण्यात आला होता. दमदार पावसाने हजेरी लावल्याने लोणावळा तसे खंडाळा परिसरातील डोंगर हिरवाईने बहरून गेले आहेत. पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण म्हणून नावाजलेल्या लोणावळ्यात वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. दर शनिवार, रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा परिसरातील विविध ठिकाणच्या पॉईंटस्वरून निसर्गाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.