लोणावळा : खंडाळा तलावात बोटिंग पुन्हा कधी सुरू?

लोणावळा : खंडाळा तलावात बोटिंग पुन्हा कधी सुरू?

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : पर्यटननगरी लोणावळा शहरातील खंडाळा विभागात असलेल्या आणि अल्पावधीत पर्यटकांचे आकर्षण ठरलेली खंडाळा तलावातील बोटिंग मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. एका अपघाताचे कारण देत बंद करण्यात आलेली बोटिंग पुन्हा कधी सुरू केले जाणार, असा प्रश्न आता लोणावळा शहरात वरचेवर फिरण्यासाठी येणारे पर्यटक तसेच लोणावळेकर नागरिक देखील उपस्थित करू लागले आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर हे बंद ठेवलेलं बोटींग तात्काळ सुरु करा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्याकडे केली आहे. लोणावळा शहरातील पर्यटन व्यावसायाला चालना देण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने खंडाळा तलावात बोटिंग सुरु करण्यात होती. सदर बोटींग ठेकेदारी पद्धतीने चलाविण्यास देण्यासंदर्भात लोणावळा नगरपरिषदेने ठराव देखील केला होता; मात्र मोठा कालावधी उलटूनही यासंदर्भात काहीही कार्यवाही न झाल्याने नगरपरिषदेमार्फतच हे बोटींग सुरू करण्यात आले होते.

दरम्यान पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले.
नगर परिषदेच्या प्रयत्नाला यश मिळाले आणि अल्पावधीत या बोटिंगला पर्यटकांसह स्थानिकांचा मोठा प्रतिसाद लाभू लागला. याठिकाणी बोटिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येऊ लागले होते. यामुळे स्थानिक नागरिकांना देखील रोजगार उपलब्ध झाला होता.

मात्र काही महिन्यांपूर्वी या तलावात बोटिंग करण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील एका अतिउत्साही महिलेने चालू बोटमध्ये उभे राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यात बोट हालल्याने तोल जाऊन ती पाण्यात पडली. स्थानिक युवकांनी सदर महिला व तीच्या मुलाला पाण्यातून बाहेर काढले होते. या घटनेनंतर लोणावळा नगरपरिषदेने सदरचा बोटिंग क्लब बंद केला आहे.

केवळ एखादी दुर्घटना घडली म्हणून त्यावर काहीही उपाययोजना न करता संपूर्ण प्रकल्पच बंद करणे हे निश्चितच योग्य नाही. नगरपरिषद कर्मचारी यांना योग्य प्रशिक्षण देऊन प्रशासनाने तात्काळ सदरचा बोटिंग प्रकल्प सुरु करत पर्यटकांसाठी खुला करून देणे गरजेचे असल्याची भूमिका प्रमोद गायकवाड यांनी मांडली. बोटिंग क्लब बंद असल्याने नगर परिषदेचा महसूल देखील बुडत आहे. खंडाळा तलावात असलेल्या पायंडल बोट ह्या पर्यटकांसाठी सुरु कराव्यात व स्पिड बोट ही जीवन रक्षकांच्या सहाय्याने सुरु करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news