लाभार्थ्यांची माहिती ’आधार’शी लिंक; डिसेंबरची मुदत

लाभार्थ्यांची माहिती ’आधार’शी लिंक; डिसेंबरची मुदत

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शालेय शिक्षण विभागांतर्गत दिल्या जाणार्‍या सवलती आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांचा माहिती साठा (डेटाबेस) तयार करून तो आधार कार्डशी जोडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. येत्या 1 जानेवारी 2023 पासून शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. राज्य शासनाच्या आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्याक विकास, कौशल्य विकास व उद्योजकता, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, महिला व बालविकास विभाग अशा विभागांद्वारे पोषण आहार, विविध सवलती आणि वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात.

या योजनांपासून लाभार्थी वंचित राहू नयेत, समाजातील विविध घटक योजनांच्या मुख्य प्रवाहात यावेत, योजना लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शी पद्धतीने पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू होता. त्याअनुषंगाने लाभार्थ्यांची माहिती आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय वित्त विभागाकडून घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने लाभार्थ्यांची माहिती आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याबाबत स्पष्ट केले आहे.

सर्व विद्यार्थी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात नियमितपणे उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यासाठी त्यांची नोंदणी आणि प्रतिदिन उपस्थिती वेब आधारित उपाययोजनाद्वारे (वेब बेस्ड अ‍ॅप्लिकेशन) अद्ययावत ठेवण्याची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. पोषण आहाराशी संबंधित माहिती आधार कार्डशी जोडूनच योजनांचा निधी देण्यात यावा. आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसलेल्या जिल्ह्यांनी ती कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news