लाखणगावात विधवा प्रथा संपुष्टात; आंबेगाव तालुक्यातील पहिलेच गाव

लाखणगावात विधवा प्रथा संपुष्टात; आंबेगाव तालुक्यातील पहिलेच गाव

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा; लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतची मासिक सभा नुकतीच पार पडली. सभेत सर्वानुमते विधवा प्रथा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच प्राजक्ता शिरीषकुमार रोडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपसरपंच साधना रवींद्र अरगडे, दस्तगीर मुजावर, प्रमोद भागवत, दिपाली वाघमारे, बाळासाहेब धरम, वंदना पडवळ, सुवर्णा पडवळ, अर्चना दौंड यांनी विचारविनिमय करून विधवा प्रथा बंद करण्याबाबतचा ठराव मंजूर केला.

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपला जावा तसेच आज विज्ञान वादी व प्रगतशील समाज म्हणून आपण वाटचाल करीत असलो तरीही पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे आदी प्रथांचे पालन केले जात आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही.

या प्रथांमुळे भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हिताचे उल्लंघन होते, त्यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे लाखणगावमध्ये यापुढे ही प्रथा कायमस्वरूपी बंद करावी असा ठराव झाला. सूचक म्हणून माजी सरपंच दस्तगीर मुजावर यांनी तर प्रमोद प्रकाश भागवत यांनी अनुमोदन केले. सभेचे इतिवृत्त ग्रामसेवक तथा सचिव प्रवीण खराडे यांनी केले. असा निर्णय घेणारी लाखणगाव ग्रामपंचायत तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरल्याने ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news