

नंदकुमार सातुर्डेकर:
पिंपरी : राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना सरकारी किमतीतील धान्यांबरोबरच साबण, शाम्पू, चहा पावडर, कॉफी या वस्तू विकण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले उत्पन्न वाढीसाठी या स्त्रोताचा अवलंब केला आहे. शहरातील 30 टक्के रेशनिंग दुकानदार आपल्या दुकानांमध्ये स्वस्त धान्याबरोबरच आता या वस्तू विक्रीसाठी ठेवत आहेत.
स्वस्त धान्य दुकानांमध्ये गहू, तांदूळ, साखर या वस्तू सरकारी किमतीत मिळतात. या दुकानांमध्ये बाजारातील अन्य वस्तू विकण्यास मनाई होती. साबण, शाम्पू, चहा पावडर, कॉफी या वस्तू विकण्यास परवानगी देण्याची मागणी स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनांकडून वेळोवेळी केली जात होती.
राज्य सरकारने या दुकानांमध्ये अन्य वस्तू विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय 9 मार्च 2020 रोजी घेतला. त्यानंतर याबाबतचा अध्यादेशही काढला होता. रेशनिंग दुकानदारांचे उत्पन्न वाढावे हा या मागील हेतू होता. काही काळ रेशनिंग दुकानदारांनी याकडे पाठ फिरवली. अन्य दुकानदारांचा अनुभव पाहून मग त्याचे अनुकरण करण्याची मानसिकता अनेक दुकानदारांची होती. मात्र, आता शहरातील अनेक रेशनिंग दुकानदार साबण, चहा कॉफी, तेल ,मीठ, मसाला या वस्तू विक्री करताना दिसत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी विभागात 77, चिंचवड विभागात 93 तर भोसरी विभागात 83 अशी 253 रेशनिंग दुकाने आहेत. यापैकी 30 टक्के दुकानदार चहा, कॉफी, तेल, मीठ, मसाला या पदार्थांची विक्री करत आहेत. यामुळे दुकानदार आपल्या उत्पन्नात भर टाकत आहेत.
राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारी किमतीतील धान्यांबरोबरच साबण, शाम्पू , चहा पावडर, कॉफी या वस्तू विकण्यास परवानगी दिली. या वस्तू बाजारभावाप्रमाणे नागरिकांना मिळतील, असे स्पष्ट केले.
आज शहरातील 30 टक्के रेशनिंग दुकानदार आपल्या दुकानांमध्ये स्वस्त धान्याबरोबरच या वस्तूंची विक्री करत आहेत. काळेवाडीतील के. जी. देशमुख नावाचे रेशनिंग दुकानदार तर तेल, मीठ, मसाला, चहा पावडर, कांदा मसाला या वस्तूंची विक्री करत आहे.
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी