राष्ट्रीय महामार्गावरील खाद्य पदार्थांच्या गाड्या हटविणार

राष्ट्रीय महामार्गावरील खाद्य पदार्थांच्या गाड्या हटविणार
Published on
Updated on

लोणावळा : पर्यटननगरी लोणावळा शहरात विकेंड तसेच सुट्यांच्या दिवसांत सातत्याने होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी अडथळा ठरणार्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, सहारा पुलावरील गाड्या तसेच शहरातील रस्त्यावरील वाहतूककोंडीला निमंत्रण ठरणार्या गाड्या काढण्यात येणार आहेत.

शहरातील वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकार्यांची आढावा बैठक नगर परिषद कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पर्यटनासाठी लोणावळा परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे शहर परिसरात वाहतूककोंडी होत आहे.

त्यामुळे स्थानिकांनादेखील घराबाहेर पडणे मुश्कील होऊन जात आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी लोणावळा नगर परिषद, शहर पोलिस, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी, मध्य रेल्वे, आयएनएस शिवाजी व पीडब्लूडीच्या अधिकार्यांची बैठक पार पडली.

यामध्ये प्रामुख्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूककोंडी, भुशी धरण मार्गावरील वाहतूककोंडी व शहरातील अंतर्गत रस्त्यावर होणारी कोंडी यावर चर्चा करण्यात आली. याविषयी बोलताना पोलिस निरीक्षक सिताराम डुबल व मुख्याधिकारी पंडीत पाटील म्हणाले, की कोणाच्या रोजगारावर आम्हाला गदा आणायची नाही. मात्र, ज्यामुळे वाहतूककोंडी वाढत आहे अशा ठिकाणी मात्र कोणाला सवलत दिली जाणार नाही. ज्याठिकाणी रस्ते लहान होऊन वाहतूककोंडी होत आहे अशा ठिकाणी सातत्यपूर्ण कारवाई करत रस्ते मोकळे ठेवले जाणार आहेत.

पुण्याच्या दिशेने जाणार्या वाहनांना अंबरवाडी गणपती मंदिर फाट्यावरून तुंगार्ली मार्गे ग्रामीण पोलिस ठाण्यासमोरून व पुढील आठवड्यापासून नारायणीधाम पोलिस चौकीसमोरून बाहेर काढले जाणार आहे. तर, मुंबईकडे जाणारी अवजड वाहने वलवण येथून द्रुतगती मार्गावर वळविण्यात येणार आहेत. याशिवाय भुशी धरणाकडून येणारी वाहने मुंबईकडे जाण्यासाठी खंडाळा रेल्वे गेट क्रमांक 30 मार्गे रायवुड येथून वळविण्यात येणार, असून पुण्याकडे जाणारी वाहने नौसेना बाग समोरून कैलासनगर, हनुमान टेकडी समोरून कुसगाववाडी येथून द्रुतगती मार्गावर सोडण्यात येणार आहे.

वाहतूक मार्गात बदल
जी वाहने मुंबई अथवा पुण्याकडे जाताना भांगरवाडी रेल्वे गेटचा वापर करतात. त्यांना संत ज्ञानेश्वर विद्यालय व पुढे जागोजागी फलक लावून कुसगाववाडी येथून द्रुतगती मार्गाकडे पाठविण्यात येणार आहे. पवना धरणाकडून येणारी वाहनेदेखील कुसगाव येथून द्रुतगती मार्गाकडे वळविण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पूल भांगरवाडीदरम्यान पूर्वीप्रमाणे एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर नारायणीधाम पोलिस चौकी ते पोलिस प्रशिक्षण केंद्राजवळील दर्ग्यापर्यंत रस्ता दुभाजक लावण्याबाबत एमएसआरडीसी व आयआरबी यांना सूचित करण्यात आले आहे.

नगरपरिषदेच्या 12 वॉर्डनची नियुक्ती
वाहतूककोंडी नियंत्रणासाठी पोलिसबळा- सोबतच नगरपरिषदेने 12 वॉर्डन दिले आहेत. याशिवाय भुशी धरण मार्गावर मदतीसाठी आयएनएस शिवाजी 12 कॅडेटस व एअरफोर्स 8 जण देणार आहेत. तर, पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त बंदोबस्त येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक डुबल व मुख्याधिकारी पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news