राज्यातील महावितरण विभागाला विजेची गळती रोखण्यात अपयश

राज्यातील महावितरण विभागाला विजेची गळती रोखण्यात अपयश

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यातील वीज वितरणातील हानी रोखण्यासाठी महावितरण विभाग विविध प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यानंतरही विजेची गळती रोखण्यात महावितरणाला यश येत नसल्याचे आर्थिक वर्ष 2020-21च्या अहवालातील आकडेवारीतून दिसून येत आहे. यानुसार, राज्यात जळगाव परिमंडळात सर्वाधिक 26.17 टक्के, तर भांडूप परिमंडळात सर्वात कमी 6.06 टक्के हानी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पुणे परिमंडलात 9.32 टक्के हानी असल्याचे दिसून आले आहे.

महावितरणची एकूण वीज वितरणातील हानी 15.29 टक्के एवढी झाली आहे. राज्यात मागील काही वर्षांपासून वीज गळतीचे प्रमाण मोठे आहे. ते कमी करण्यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना राबवण्यात येतात. राज्यात एकूण महावितरणचे 16 परिमंडळ कार्यरत आहेत. राज्यातील वीज गळतीत यंदाही वाढ झाली. त्या आधीच्या वर्षीत राज्यात 14.17 टक्के वीज हानी झाली होती. तर आता हा आकडा 15.29 टक्क्यांवर गेला आहे.

भांडूप, नागपूर आणि पुणे परिमंडळ वगळता उर्वरित सर्वच परिमंडळात 10 टक्क्यांपेक्षा अधिक वीज गळतीचे प्रमाण आहे. यंदा अकोला, अमरावती, बारामती, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, कल्याण, कोकण, लातूर, नांदेड, नाशिक आणि औरंगाबाद या परिमंडळात वीज हानीत वाढ झाली. तर पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि भांडूप या परिमंडळात वीज हानी कमी करण्यात महावितरणला यश आले.
राज्यात महानिर्मिती आणि काही खासगी कंपन्यांद्वारे वीज उत्पादन होते. तर वीज वहनाचे काम महापारेषणकडून होते.

ही वीजग्राहकांपर्यंत वितरीत करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. अनेकदा वीज वहन करताना गळती होणे, मीटरमध्ये फेरफार करणे, वीज वाहिन्यांवर आकडे टाकून वीज घेणे, यासह इतर कारणांमुळे वीज वितरणात हानी होते. त्याचा परिणाम विजेच्या महसुलावर होत असतो. ही बाब लक्षात घेऊन वीजवितरण हानी कमी करण्यावर महावितरण लक्ष देत असते. मात्र, अनेक प्रयत्न करूनही महावितरणला वितरणातील हानी कमी करण्यात अपयश येत असल्याचे दिसून येते आहे.

आर्थिक वर्ष 2020-21 मधील वितरणातील हानी
परिमंडल टक्केवारी  – परिमंडल टक्केवारी
अकोला – 24.09
अमरावती – 16.67
औरंगाबाद – 17.54
बारामती – 14.81
भांडुप – 6.06
चंद्रपूर – 12.41
गोंदिया – 13.45
जळगाव – 26.17
कल्याण – 13.20
कोकण – 15.89
कोल्हापूर – 10.27
लातूर – 23.43
नागपूर – 8.31
नांदेड – 25.32
नाशिक – 16.95
पुणे – 9.32

महावितरण एकूण – 15.29

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news