राज ठाकरे म्हणाले, पवारांना औरंगजेब सूफी संत वाटतो काय?

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : एमआयएमच्या औलादी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतात. तरीही महाराष्ट्र पेटून उठत नाही. आपण फक्त थंड गोळे बनलो आहोत. मोबाईल चॅटिंगमध्ये गुंतलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तर म्हणतात, औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आला नव्हता, तर विस्तार करायला आला होता. तुम्हाला औरंगजेब सूफी संत वाटतो काय, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील सभेत केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.

शरद पवारांनी स्वतःच्या सोयीसाठी इतिहास बदलू नये. प्रतापगडावर पूर्वी अफजलखानाची छोटी कबर होती. आता त्याचे भव्य मशिदीत रूपांतर झाले आहे. त्याचा विस्तार 15 ते 20 हजार चौरस फुटांनी वाढला आहे. हे सर्व करण्यासाठी त्यांना कोण मदत करतंय, कोण आहेत ही माणसं, असा सवाल त्यांनी केला.

शहरातील स्वारगेट भागातील गणेश कला व क्रीडा मंच या सभागृहात राज ठाकरे यांची रविवारी सकाळी 10 वाजता सभा झाली. सभास्थानी प्रचंड गर्दी झाल्याने सभागृह कमी पडले. त्यामुळे बाहेर पडदा लावावा लागला. तेथे बसून व उभे राहून मनसैनिकांसह नागरिकांनी त्यांचे भाषण ऐकले.

या सभेत 35 मिनिटांच्या भाषणात त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. औरंगाबादचे नामांतर, समान नागरी कायदा व लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा मोदी सरकारने करावा, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

'आमच्या आंदोलनामुळेच अजान बंद झाली'

आमच्या आंदोलनामुळे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळची अजान बंद झाली. आपण थंड बसल्याने आपल्यावर नऊशे वर्षे परकीयांनी राज्य केले, असे राज ठाकरे म्हणाले. आपल्याला भोंग्यावर सतत लक्ष ठेवावे लागेल. नाहीतर हळूहळू पुन्हा त्यांचा आवाज वाढेल. त्यामुळे मी लवकरच एक पत्रक काढणार आहे. ते घराघरांत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

'अयोध्या दौरा रोखण्यासाठी महाराष्ट्रातून रसद'

माझ्या अयोध्या दौर्‍याची तारीख अनेकांना खुपली. महाराष्ट्रातूनच त्यासाठी रसद पुरवली गेली. माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट होता. माझ्या कार्यकर्त्यांना मी हकनाक गमावणार नाही. त्यामुळे मी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, मी अयोध्या दौरा रद्द केल्याचे पत्र टाकले. त्यामुळे अनेकजण निराश झाले. काहींना आनंद झाला. म्हणून मी काही वेळ देऊन माझे मत मांडायला आलो आहे. मला आठवतं, मुलायसिंग सरकार तिथे होते, तेव्हा अनेक कारसेवकांना ठार मारण्यात आले. शरयू नदीत त्यांची प्रेते तरंगताना मी टीव्हीवर पाहिली. त्यांचे स्मारक तिथे आहे. त्याचे दर्शन घ्यायचे होते. पण मी गेल्यावर तिथे काही झाले असते तर आपली पोरं अंगावर गेली असती. मग त्यांच्यावर पोलिस केस ऐन निवडणुकीत लावल्या असत्या. हा सगळा ट्रॅप होता.

मातोश्री बंगला म्हणजे मशीद आहे का?

राज यांनी सुरुवातीला नाव न घेता शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले, आमच्या सभेला पुण्यात जागाच देत नव्हते. नदी पात्रात पाऊस पडेल म्हणून ती रद्द केली. अहो, आता निवडणुका नाहीत. मग उगाच पावसात भिजत सभा कशाला घ्यायच्या… या वाक्यावर सभागृहात प्रचंड टाळ्या पडल्या. राणा दाम्पत्याने मातोश्री बंगल्यासमोर हनुमानचालिसा म्हटली. अहो 'मातोश्री' म्हणजे मशीद आहे काय? बरं, मुंबईत इतका गोंधळ घातला आणि त्यानंतर राणा दाम्पत्य लडाखमध्ये संजय राऊतांसोबत जेवताना दिसले. हा सगळा ढोंगीपणा आहे. शरद पवारही सांगतात, मी आणि बाळासाहेब दिवसभर जाहीरपणे एकमेकांच्या विरोधात आक्रमकपणे बोलायचो. रात्री मात्र आम्ही जेवणासाठी एकत्र असायचो, असे सांगून शरद पवार बाळासाहेबांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत आहेत, असे ते म्हणाले.

हल्ली हिंदुत्वावरच स्पर्धा चाललीय. उद्धव ठाकरे म्हणतात, आमचं हिंदुत्व खरं, तुमचं खोटं. अरे, हिंदुत्व म्हणजे वॉशिंग पावडर आहे का? तुमचे शुभ्र, आमचे मळलेले, असा काही प्रकार आहे का!

औरंगाबादचे नामांतर करा

औरंगाबादच्या नामांतरावरूनही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, औरंगाबादचे नामांतर मुद्दाम टाळले जात आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले की, यांना दुसरा मुद्दाच राहणार नाही. मग निवडणुका कशाच्या आधारावर लढवायच्या! तो एकच तर मुद्दा आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, मी संभाजीनगर असेच म्हणतोय. त्यासाठी नामांतराची गरज काय? तुम्ही म्हटला म्हणजे झाले काय? तुम्ही कोण सरदार वल्लभभाई पटेल आहात की महात्मा गांधी…! अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडवट टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या नावावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांचा तिथला खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. आपण राक्षसाला पाळत आहोत, हे त्यांच्या लक्षातच आले नाही. माझी मोदी सरकारला एक विनंती आहे की, त्या औरंगाबादचे एकदा नामांतर करूनच टाका म्हणजे सगळे विषय संपतील एकदाचे, असे राज ठाकरे आपल्या घणाघाती भाषणात म्हणाले.

1 जूनला माझे ऑपरेशन…

माझा पाय दुखतो आहे. हे दुखणे फार वाढले. त्यामुळे माझ्या कंबरेच्या खुब्याचे ऑपरेशन 1 जूनला आहे, असे सांगत त्यांनी कंबरेकडे बोट दाखवले. त्यानंतर पत्रकारांना उद्देशून म्हणाले, ही लोकं कुठचे कुठचे अवयव दाखवतील काही सांगता येत नाही. म्हणूनच मला हे सांगावं लागतंय. चॅनल्सच्या अतिरेकीपणावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, हे चॅनलवाले काहीही दाखवत सुटतात. मी पुण्यात पुस्तकांच्या दालनात खरेदीसाठी गेलो. तेथेही हे पोहोचले.

माझ्या सभेचे कव्हरेज ठीक आहे. पण आता निघाले, त्यांचा पाय बाहेर पडला. ते पोहोचले हे सगळं कशाला सांगता, असे सांगत त्यांनी खिल्ली उडवली. मी ऑपरेशन झाल्यावर एक महिनाभर आराम करून पुन्हा तुमच्या भेटीला येईन, असे म्हणत त्यांनी गर्दीने खचाखच भरलेल्या सभागृहाचा निरोप घेतला. व्यासपीठावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन देसाई, राज यांचा मुलगा अमित ठाकरे व शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज ठाकरे उवाच…

* मला अयोध्येत अडकवण्याचा
* कट, त्यासाठी महाराष्ट्रातून रसद
* हिंदुत्व म्हणजे उद्धव ठाकरे यांना
* वॉशिंग पावडर वाटते काय?
* मुलायमसिंगांच्या राजवटीत अनेक कारसेवकांची हत्या
* 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा म्हणायला ती काय मशीद आहे काय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news