येरवडा : रस्त्याच्या कामाने वाहनचालक त्रस्त

येरवडा : रस्त्याच्या कामाने वाहनचालक त्रस्त

येरवडा, पुढारी वृत्तसेवा: लोहगाव-वाघोली रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी संतनगर या ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. पावसाळ्यात रस्ता खोदल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात होत आहेत. वाहतूक कोंडीदेखील होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लोहगाव-वाघोली रस्त्याचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विकास निधीतून काँक्रिटीकरण सुरू आहे. रस्त्याची खोदाई केल्यानंतर काही दिवस काम बंद होते. खोदाई केलेल्या ठिकाणी डबर जरी टाकले असले, तरी खड्डे पडले असून, वाहने सावकाश जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. पेट्रोल पंपासमोर रस्ता चढ-उताराचा झाल्याने रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत.

त्यामुळे अशी रस्तादुरुस्ती काय कामाची, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. कर्मभूमीनगर भागात पावसाळी लाइनच नाही. ड्रेनेजलाइनचीही चांगली सफाई न झाल्याने येथे ड्रेनेज तुंबून चेंबर ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर पाणी साचत आहे. साहजिकच, येथून वाहने मार्गस्थ होताना वाहतूक मंदावली असून, दुचाकीस्वारांना वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे.
याबाबत आमदार सुनील टिंगरे म्हणाले की, रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे काम थांबले होते. आता काम पुन्हा सुरू झाले आहे. काम होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी जान्हवी रोडे म्हणाल्या, 'रस्त्याचे काम सुरू केले अन् पाऊस सुरू झाला. पावसात काम करता येत नसल्याने काम थांबले होते. आता पाऊस उघडला असून, काम सुरू झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news