यवत; पुढारी वृत्तसेवा: यवत (ता. दौंड) येथे 27 जुलै रोजी झालेल्या संजय सखाराम बनकर (रा. तांबेवाडी, खामगाव, ता. दौंड; मूळ रा. मुरारजी पेठ, निराळेवस्ती, महादेव मंदिराजवळ, चिंचनगर, सोलापूर) यांच्या खुनातील नेपाळी आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे. राजबहादूर बालूसिंग ठाकूर ऊर्फ राजू सारखी (वय 47, रा. यवत, ता. दौंड; मूळ रा. पहाडीपूर, नेपाळ) असे त्याचे नाव आहे.
राजू सारखी हा पालखीतळावर बसला असताना मयत बनकर याने दारू पिऊन त्याला शिवीगाळ करून कानाखाली चापट मारल्याने सारखी याने चिडून जाऊन बनकर यांच्या पोटात चाकू मारून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. 27 जुलैला खून झाल्यानंतर गुन्ह्याचा समांतर तपास यवत पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत असताना गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके व पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी चार पथके तयार केली होती.
पोलिस निरीक्षक नारायण पवार, हवालदार नीलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव यांना गोपनीय माहिती मिळाली की, यातील आरोपी हा नेपाळचा रहिवासी असून, तो दौंड रेल्वेस्टेशन येथून नेपाळला जाणार आहे. माहिती मिळाल्यावर सहायक निरीक्षक केशव वाबळे, हवालदार नीलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, सचिन घाडगे, नाईक अक्षय यादव यांनी दोन दिवस दौंड रेल्वेस्टेशन येथे सापळा लावला.
6 ऑगस्ट रोजी मध्यरात्री आरोपी राजू सारखी यास ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, गुन्ह्याचा पुढील अधिक तपास यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक, मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला.