मोशी : उपनगरात एकदशीनिमित्त विठूनामाचा गजर

मोशी : उपनगरात एकदशीनिमित्त विठूनामाचा गजर
Published on
Updated on

मोशी : आळंदी-पुणे रस्त्यावरील चर्‍होली-वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात सकाळी श्री पांडुरंगाची महापूजा करण्यात आली. या वेळी श्री विठ्ठल रुक्मिणीमाता आणि माऊलींच्या मूर्तीची महापूजा, अभिषेक हरिनाम गजरात करण्यात आला. आषाढी एकादशीनिमित्त दही, दूध, मधाचा सुगंधित अभिषेक करण्यात आला. ट्रस्टचे संस्थापक अ‍ॅड. विष्णू तापकीर, मयूर तापकीर, कीर्ती तापकीर यांनी महापूजा केली.

श्री पांडुरंग, श्री रुक्मिणी माता आणि माऊलींच्या वैभवी मूर्तीची महापूजा उत्साहात करण्यात आली. या वेळी राजेंद्र नाणेकर, शिवाजी गराडे, राहुल होळकर, हर्षद अरबट, विठ्ठल पांचाळ यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विष्णू तापकीर यांच्या हस्ते 'श्रीं'ची आरती करण्यात आली. महापूजेनंतर 'श्रीं'ना महाप्रसाद नैवेद्य वाढविण्यात आला.

भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त फराळ, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी व्यंकटेशमहाराज बिराजदार यांचे कीर्तन झाले. या वेळी गायक, वादक कीर्तनकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भोसरीतील मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट
भोसरी : परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी भक्तीभावात व उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच, विठ्ठल मंदिरात भजन, कीर्तन, हरिपाठ, महाअभिषेक आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना पांडुरंगाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. विठ्ठल मंदिराला रंगरंगोटी व आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. टाळ, मृदंगाच्या गजराने व विठू नामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. या वेळी भोसरी ग्रामस्थ उपस्थित होते.
भोसरी गावठाणातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा व अभिषेक भोसरी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. कोरोनामुळे दोन वर्षांत आषाढीनिमित्त भाविकांना पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले नव्हते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
भोसरी गावठाणातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाहटे काकडारती करण्यात आली. सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. भोसरी ग्रामस्थ भजनी मंडळाच्यावतीने भजन, कीर्तन, हरिपाठ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, या वेळी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.

पिंपळे गुरव येथे पावसातही भाविकांच्या रांगा
पिंपळे गुरव : आषाढी एकादशीनिमित्त पिंपळे गुरव भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी
केली होती. येथील नामदेव विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जवळकरनगर येथील मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी रिमझिम पाउस सुरू असल्याने भाविकांनी दुपारीनंतर दर्शन घेणे पसंत केले.

पिंपळे गुरवतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी अभिषेक, महाआरती करण्यात आली. या वेळी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला विविध दागिने आणि पेहराव करण्यात आला होता. तसेच, एकादशीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या वेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

दापोडीत महाआरती
दापोडी : फुगेवाडी, कासारवाडी, दापोडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी फुगेवाडी येथील मंदिरामध्ये भार्गवी मुळे, आकांक्षा काळे, सचिन बारणे, गणेश पवार, सुरेश चव्हाण या बाल वारकर्‍यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळी संजय काटे, शिवाजी काची, कालीचरण पाटोळे, संतोष काटे, निखिल मते
उपस्थित होते. विठ्ठल तरुण मंडळ वरळी आली येथे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. राजेंद्र जोशी, प्रतिभा जोशी, हभप सोपानराव भाडाळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
स्मार्ट किड्झ शाळा दापोडी आषाढी एकादशीनिमित्त लहान मुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान करून दापोडी परिसरामध्ये विठ्ठल नामाचा गजर करत मिरवणूक काढली. या वेळी अस्मिता कांबळे, जयश्री शिंदे, कल्याणी शिंदे, अजिंक्य शिंदे, शबिना शेख यांसह अन्य विद्यार्थी सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news