

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पालिकेत समावेश करण्यात आलेल्या नांदेड, खडकवासला, किरकटवाडीसह सिंहगड रोड भागात मोकाट कुत्री व डुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे प्रशासन हतबल झाले आहे. जुन्या हद्दीतील कुत्री व डुकरे या भागात सोडण्यात येत आहेत. डुकरांची संख्या जवळपास दोन हजारांहून अधिक आहे.
किरकटवाडी, जयप्रकाश नारायणनगर वसाहत, खडकवासला, नांदेडसह मुख्य सिंहगड रोडवर डुकरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अंगणात खेळणार्या लहान मुलांवर डुकरे हल्ला करत आहेत. खडकवासला विभागाचे आरोग्य निरीक्षक रूपेश मते म्हणाले, 'नांदेड, खडकवासला भागात डुकरे आणि कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित विभागाला पत्र देण्यात आले आहे.'
बकालीकरण वाढले
ग्रामपंचायत काळात या भागात डुकरे, कुत्र्यांची संख्या कमी होती. मात्र, महापालिकेत गावांचा समावेश झाल्यापासून गेल्या वर्षभरात अचानक डुकरांची संख्या वाढली आहे. कोथरूड, हडपसर, कात्रज भागातील डुकरे खडकवासला भागात सोडली जात आहेत. डुकरांचे मालक रातोरात डुकरांना खाद्यपदार्थ टाकून गायब होत आहेत. सडलेले मांस, खाद्यपदार्थांच्या कचर्याचे ढिगारे ओढे-नाले, मुख्य रस्त्यावर साठल्याने दुर्गंधी पसरली आहे.
आरोग्य विभाग हतबल…
खडकवासला येथे डुकरांना सडलेले खाद्यपदार्थ टाकताना स्थानिक कार्यकर्ते अमोल बोरकर यांनी एक टेम्पो पकडला. आरोग्य विभागाने एकावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. मात्र, खाद्यपदार्थ टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग हतबल झाला आहे.