मुसळधार पावसाने सोमेश्वरचे तळे भरले

मुसळधार पावसाने सोमेश्वरचे तळे भरले

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने सोमेश्वर मंदिर परिसरातील सोमयाचे तळे पूर्ण भरले आहे. तळ्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. ऑगस्ट महिन्यात हे तळे निम्मे भरले होते. मात्र, या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे हे तळे पूर्ण भरले. तळे भरल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. येथील तळ्याचे खोलीकरण केल्याने व गाळ उपसल्याने पाण्याची पातळी वाढली असून, उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकेल असा अंदाज आहे.

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी रात्री सोमेश्वरनगर परिसरात पावसाने हजेरी लावली. जिरायती भागाला पावसाने ओढ दिली होती. मात्र, या भागातही जोरदार पाऊस बरसल्याने पाण्याची समस्या मिटली आहे. गणपती विसर्जनानंतर बाजरी पिकांची काढणी-मळणी सुरू होणार आहे. वीर धरणातून निरा नदीत दीड महिन्यापासून कमी अधिक प्रमाणात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग पाऊस थांबल्याने बंद करण्यात आला होता तो आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कर्‍हा नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे. सलग पावसामुळे जिरायती व बागायती भागातील ओढे, तलाव, नाले, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news