

खारावडे; पुढारी वृत्तसेवा: मुठा (ता. मुळशी) येथील गावाजवळील मुठा घाटातील रस्त्यावर दरड कोसळली आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) संध्याकाळी सहा वाजता घडली आहे. या परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.
जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे परिसरातील मातीत पाणी मुरून माती ढिसूळ होऊन जागोजागी दरडी पडत आहे. तसेच या परिसरात जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी जास्त प्रमाणात पाणीदेखील साचत आहे. बांधकाम विभागाने घाटातील पडलेले दगडी व दरड माती रात्री उशिरापर्यंत काढली गेली नव्हती.