मुलांसाठी पतीने पत्नीला दिली किडनी

नंदाराम मोहंडुळे, शांताबाई व त्यांची दोन मुले.
नंदाराम मोहंडुळे, शांताबाई व त्यांची दोन मुले.

नितीन वाबळे

मुंढवा : महिन्याला जेमतेम पगार, त्यात घर चालवायचे, मुलांचे शिक्षण, अशी कसरत करीत असताना पत्नीला किडनीचा आजार झाला. पण, खचून न जाता पतीने आपल्या पत्नीला किडनी दिली आणि तिचे प्राण वाचविले. कोरेगाव पार्क येथील इनलॅक्स व बुधराणी हॉस्पिटल येथे वाजवी दरामध्ये किडनीतज्ज्ञ डॉ. भूपेशकुमार कवारे व यूरोलॉजिस्ट डॉ. अनुराग अवस्थी यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.

नंदाराम पुंडलिक मोहंडुळे असे त्यांचे नाव आहे. ते मंचर येथे ते राहतात. त्यांची पत्नी शांताबाई मोहंडुळे यांना मागील दोन वर्षांपासून किडनीचा आजार होता. त्यांना दोन मुले असून एक बी.एस्सी. अ‍ॅग्री तर दुसरा मुलगा इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. किडनीच्या आजारामुळे बुधराणी हॉस्पिटल येथे शांताबाई यांचे आठवड्यातून तीन दिवस डायलेसीस होत होते.

त्यासाठी महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येत होता. इतके करूनही त्यांचा बीपी नेहमी वाढलेला असायचा व डायलेसीस झाल्यावर दुस-या दिवशीही त्यांना खूप त्रास व्हायचा. दोन्ही मुले आईच्या आजारपणामुळे चिंतेत असायची. त्यांचे अभ्यासावर लक्ष लागत नव्हते. या सर्व परिस्थितीत नंदाराम व त्यांच्या मुलांनी शांताबाई यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.

पण, किडनी कोण देणार, आर्थिक परिस्थितीमुळे खूप अडचणी येत होत्या. अखेर सर्व परिस्थितीचा स्वीकार करून नंदाराम यांनी स्वतःची किडनी पत्नीला देण्याचा निर्णय घेतला. आणि मागील आठवड्यात त्यांची बुधराणी हॉस्पिटल येथे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. किडनी प्रत्यारोपण झाल्यावर आपली आई आजारातून मुक्त होणार, या आनंदाने मुलांच्या चेह-यावर आनंदाश्रू ओघळू लागले.
नंदाराम मोहंडुळे, शांताबाई व त्यांची दोन मुले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news