पुणे : पुढारी वृत्तसेवा : माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा एवढा सुळसुळाट झालाय, की एका कार्यकर्त्याने थेट महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील आंब्यांनाच हात घातला आहे. बंगल्याच्या आवारातील आंब्याच्या झाडाला आलेल्या आंब्यांच्या वापराच्या माहितीबरोबरच एक डझन आंब्यांचे नमुनेही द्यावेत, अशी अजब मागणी महापालिकेकडे केली आहे. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार कमी व्हावा आणि कामात पारदर्शकता यावी, यासाठी माहिती अधिकार कायदा आणला गेला.
या कायद्याचा उद्देश सफल होत असला, तरी त्याचा गैरवापर करणार्यांची संख्याही वाढत चालली आहे. त्यातून ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढत चालले असून, अनावश्यक माहिती मागवून प्रशासनाचा वेळ खाण्याचे उद्योग काही स्वयंघोषित माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून सातत्याने सुरू असतात. आता पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात आलेल्या एका माहिती अधिकाराच्या अर्जाने तर कळसच गाठला आहे. या अर्जाने प्रशासनालाही नक्की हसावे की रडावे, असा प्रश्न पडला आहे.
एका ज्येष्ठ नागरिकाने थेट महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात किती आंब्याची झाडे आहेत आणि त्याला येणार्या आंब्यांबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मॉडेल कॉलनी येथील महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या आवारात आंब्याच्या झाडांची संख्या किती आहे, या आंब्याच्या झाडाला आलेल्या आंब्यांचा वापर नक्की कसा होतो, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यावर न थांबता या माहिती अधिकार कार्यकर्त्याने या माहितीसमवेतच या आंब्याच्या झाडाला आलेल्या आंब्यांचे 12 (एक डझन) नमुने द्यावेत, अशीही अजब स्वरूपाची मागणी केली आहे. तसेच, आयुक्तांच्या लोगोवर सही-शिक्क्यासह ही माहिती प्रमाणित हवे, असे त्यांनी अर्जात स्पष्ट केले आहे.
अशा पद्धतीची माहिती म्हणजे हा पूर्ण खोडसाळपणा आहे. कायद्यानुसार झाडांची माहिती आणि आंब्यांचा वापर, याची माहिती मागू शकता. त्यासमवेत सॅम्पल मागण्याची जरी तरतूद असली, तरी आंब्याचे सॅम्पल मागविणे चुकीचे आहे. आता आंब्याची माहिती मागविली. उद्या सोन्या-चांदीच्या व्यवहाराची माहिती मागविताना सोने आणि चांदी यांचे नमुनेही द्या म्हणतील. त्यामुळे अशी माहिती मागविणे चुकीचे आणि निषेधार्हसुध्दा आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनीच कायद्याचा चुकीचा वापर होऊ नये, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
– विजय कुंभार, ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते
हेही वाचा