

टाकवे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील सीएनजी पंपावर दिवसेंदिवस गर्दी वाढत असून कंपन्यांकडून सीएनजी गॅसचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याने सीएनजी भरण्यासाठी नागरिकांना तासन्तास सीएनजी पंपावर थांबावे लागत आहे.
मावळ तालुक्यात पुणे, मुबंई महामार्गावर तळेगाव, वडगाव, कामशेत, कार्ला या ठिकाणी सीएनजी पंप उपलब्ध असून येथे पंधरा दिवसापासून या पंपावर सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे.
त्यामुळे वाहन चालक नाराजी व्यक्त करत आहेत. कधी सीएनजी असतो, तर वीज पुरवठा नसल्याने पंप बंद असतो. गेल्या पंधरा दिवसांपासून या प्रकारच्या त्रासाला वाहन चालकांना सामोरे जावे लागत आहे; मात्र तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न वाहनचालकातून उपस्थित केला जात आहे.
पेट्रोल व डिझेल या इंधनांपेक्षा सीएनजी गॅसचा दर कमी व उत्तम मायलेज असल्याने तसेच हे इंधन प्रदूषण विरहित असल्याने अनेक मध्यमवर्गीय व नोकरदारांनी छोट्या सीएनजी इंधनावर चालणार्या मोटारी घेतल्या; तसेच अनेक प्रवासी व मालवाहतूक करणा़र्या व्यावसायिकांनी देखील सीएनजी इंधनावर चालणारी वाहने घेतल्याने सीएनजी इंधनातच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
तसेच राज्य शासनाने देखील प्रदूषण विरहित इंधनावर चालणार्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मागील महिन्यात सीएनजी इंधन राज्यात करमुक्त केले होते; मात्र केंद्र सरकारकडून सीएनजी इंधनाचे दर पुन्हा वाढविल्याने सीएनजी इंधनावरील वाहने घेतलेले नागरिक अडचणीत आले आहेत.
मागील वर्षे भरात सीएनजी गॅसच्या दरात साधारणत: 25 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र तरी देखील पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत सीएनजी गॅस स्वस्त असल्याने व वाहनांना उत्तम मायलेज मिळत असल्याने नागरिक सीएनजी गॅस पांपावर प्रचंड गर्दी करत आहेत.
मावळात एमएनजीएलचे चार सीएनजी पंप आहे. या सीएनजी पंपांना पुरेसा सीएनजी गॅसचा पुरवठा होत नसल्याने तसेच वीज पुरवठा खंडित होणे व तांत्रिक अडचणींमुळे वाहन चालकांना सीएनजी भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
मागील काही दिवसांपासून मावळतील सर्वच सीएनजी पंपांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सीएनजीच्या अनियमिततेमुळे वाहन चालक त्रस्त झाले असून, प्रदूषण विरहित इंधनाचा वापर म्हणजे मनस्ताप ठरत आहे. यामुळे मावळात अधिक सीएनजी पंप सुरु करावेत,.तसेच उपलब्ध असलेल्या सीएनजी पंपावर मुबलक गॅस पुरवठा करण्याची नागरिक मागणी करत आहेत.
जनरेटर उपलब्ध करून देण्याची मागणी
मावळ तालुक्यात रोज सुमारे वीस ते बावीस हजार किलो सीएनजीची विक्री होते. कामशेत येथील पंपावर नियमित वीज असल्यास दररोज सुमारे सहा हजार किलो सीएनजीची विक्री होते. वीज पुरवठा नसल्यास वाहनचालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. संबंधित कंपनीने पंपचालकांना जनरेटर उपलब्ध करू दिल्यास ही समस्या उद्भवणार नाही, अशी माहिती एका पंपचालकाने दिली.
सीएनजीच्या तुडवड्यामुळे छोट्या व्यावसायिकांवर परिणाम
सीएनजी इंधनावर चालणारे रिक्षा, मालवाहतूक करणारी छोटी वाहने यांना वेळेवर सीएनजी गॅस मिळत नसल्याने त्यांना आपली वाहने बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे रिक्षा व छोटे टेम्पो चालवून उपजीविका करणार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.