

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : मावळतील भुशी डॅम व अन्य पर्यटन स्थळावर जाण्यास मनाई करण्यात आल्यामुळे आता पिंपरी चिंचवडच्या पर्यटकांनी देहू रोडला गर्दी केली आहे. घोरावेश्वर डोंगर आणि कुंड मळा येथील नदी येथे जाऊन आनंद घेत आहेत. मात्र त्यांचा हा आनंद गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.
मावळातील भुशी डॅम, ड्युक्स नेक आधी जवळपास दहाहून अधिक पर्यटन स्थळे पावसामुळे बंद करण्यात आली आहेत. काही हुल्लडबाज मंडळी बंदीचे आदेश जुगारून येथे जात आहेत पण त्यांना पोलीस थांबू देत नाहीत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडकरांनी आज श्री शेत्र घोरवडेश्वर डोंगर आणि कुंडमळा येथील नदीवर पावसात भिजण्याचा आनंद घेतला.
नदीवर तोबा गर्दी झाली होती. गावातील तरुणांनी या ठिकाणी दोऱ्या बांधून दोरीच्या पुढे जाऊ नये याबाबत बजावले आहे. जागोजाग जनजागृती करणारे फलक ही लावले आहेत. पण तरुणाई काही ऐकायचे नाव घेत नाही. दोऱ्यांच्या पुढे जाऊन सेल्फी घेतल्या जातात. तर काहीजण अत्यंत धोकादायक पद्धतीने फोटो काढत होते.
इंद्रायणीच्या पाण्याची पातळी भरपूर वाढली आहे. मावळातील वडिवळे व आंद्रा धरणातून विसर्ग होत आहे. त्यामुळे इंद्रायणीला पुराची परिस्थिती आहे. अशावेळी लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. या नदीवर बांधलेला पूल जवळपास पंधरा ते वीस फुटांनी एक बाजूने तुटला आहे. त्यामुळे पुलाला एका बाजूला कठडाच उरला नाही. मात्र तरीही जीव धोक्यात घालून ही मंडळी येथे येत होती.
घोरवडेश्वराच्या पायथ्याला पार्किंग फुल झाले होते. तरुणाई डोंगरात भटकत होती. येथील काही कडे निसरडे झाले आहेत. त्यामुळे तिथे जाताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे पर्यटक बेफाम वागताना दिसत होते. काही दिवसांपूर्वी एक तरुणी नदीच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यामुळे रांजण खळगे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी जीवाची परवा करून निसर्गाचा आनंद घ्यावा.