

अमृत भांडवलकर: नारायणपूर : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा लाखो वैष्णवांसह माउली नामाचा जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत (ता. पुरंदर) शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दाखल झाला. यावेळी पालखी रथावर नगरपालिकेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात येऊन माउलींचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले.
सासवडनगरीत माउलींच्या स्वागतासाठी दुतर्फा गर्दी होती.
रांगोळ्या, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी करत माउली….माउलींच्या जयघोषाने सोहळा रंगला. माउलींच्या पालखी सोहळ्याचा सासवडनगरीत शुक्रवार (दि.24) आणि शनिवार (दि.25) असा दोन दिवसांचा मुक्काम आहे. नगरीत माउलींच्या पालखीचे आगमन झाल्यावर चंदन टेकडी येथे नगरपरिषदेच्या वतीने आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी निखील मोरे, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी उपनगराध्यक्षा विजय वढणे, सुहास लांडगे, अजित जगताप, मनोहर जगताप, संदीप जगताप, सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका आणि विभाग प्रमुखांनी सर्व दिंडी प्रमुख, विणेकरी, चोपदार यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन माउलींच्या पालखी रथाचे स्वागत केले.
सासवडमध्ये माउलींचे धाकटे बंधू संत सोपानकाका यांची समाधी आहे. माउलींचा सोहळा सासवड नगरीत असतानाच सोपनकाकांचा पालखी सोहळा पंढरीकडे प्रस्थान करत असतो. सासवडनगरीत वारकर्यांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. वारकर्यांचे पाय चेपून देण्यापासून ते त्यांचे केश कर्तन, आरोग्य तपासणी असे अनेक सेवाभावी उपक्रम पालखी मुक्कामाच्या वेळी सासवडकर राबवत असतात. दिवे घाटाचा पालखी सोहळ्यातील सर्वात मोठा दमछाक करणारा टप्पा पार करून वारकरी सासवडनगरीत दाखल झाले असल्याने शनिवारी त्यांच्या सेवेसाठी अनेक हात पुढे आले आहेत. सासवड नगरपालिका, आरोग्य विभाग, महसूल, पोलिस यंत्रणा यांनी व्यवस्था अतिशय उत्तम ठेवली आहे. पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी स्वत: प्रत्येक ठिकाणी पाहणी करून सर्व यंत्रणा व्यवस्थित केल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांत कोरोना साथीमुळे पायी पालखी सोहळा निघाला नसल्याने या वेळी वारकर्यांचा उत्साह मोठा होता. वारकर्यांची संख्याही या वेळी वाढलेली आहे. गावाकडे पाऊस झाला नाही, पेरण्या खोळंबल्या, तरीही त्याकडे लक्ष न देता वारकरी केल्या दोन वर्षांचा दुरावा असल्याने पायी वारी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. माहेरची ओढ लागावी तशी वारकर्यांना पंढरीची ओढ लागली आहे. भक्तिमय वातावरणात नाचत-बागडत वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी माउलींच्या सोबतीने निघालेले आहेत. पंढरीच्या वाटेवर सासवडनगरीत विसावलेल्या या वारकरी मंडळींना काहीही अडचण येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा