

पुणे : पुढारी वृत्तसेवा : "गिरिप्रेमी संस्थेने माउंट मेरू या आगामी महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली आहेे. ऑगस्ट- सप्टेंबर 2023 मध्ये ही मोहीम पार पडेल," अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा उषःप्रभा पागे, आनंद पाळंदे, मोहिमेचे नेते उमेश झिरपे व भूषण हर्षे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेरू शिखर हे 6660 मीटर उंच असून, त्याच्या नैऋत्य धारेने या मोहिमेंतर्गत चढाई करण्यात येणार आहे.
या मार्गाने या आधी एकही भारतीय मोहीम झालेली नाही. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्यास अशी कामगिरी करणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल. या आधी गिरिप्रेमीने जगातील 14 पैकी आठ अष्टहजारी शिखरांना गवसणी घातली आहे. यात एव्हरेस्ट, कांचनजुंगा, अन्नपूर्णा आदी शिखरांचा समावेश आहे.
तसेच माउंट मंदा या शिखरावरदेखील यशस्वी मोहीम करण्यात गिरिप्रेमीला यश आले आहे. माउंट मेरू मोहिमेचे नेतृत्व उमेश झिरपे हे करणार आहे. एअरफोर्स अॅडव्हेंचर विंगचे प्रमुख विंग कमांडर देवीदत्त पंडा, पाच अष्टहजारी शिखरांना गवसणी घालणारा आशिष माने, अन्नपूर्णा, कांचनजुंगा, च्यो ओयू सारख्या शिखरांवर चढाई करणारा डॉ. सुमित मांदळे, एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखर चढाई यशस्वी करणारा कृष्णा ढोकले, कांचनजुंगा, अमा दब्लम, माउंट मंदा शिखरांवर तिरंगा फडकविणारा विवेक शिवदे, माउंट मंदावर यशस्वी चढाई करणारा पवन हडोळे व निष्णात प्रस्तरारोहक व नवोदित गिर्यारोहक वरुण भागवत हे मोहिमेत सहभागी होणार आहेत. या वर्षभरात या मोहिमेची हिमालयात, तसेच सह्याद्रीत सराव मोहिमा होणार आहेत. या मोहिमेचा 60 लाख रुपये खर्च येणार असून, त्यासाठी 'गिरिप्रेमी'तर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे माउंट मेरू
उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालयात माउंट मेरू हे शिखर आहे. त्याची उंची 6660 मीटर असून, या शिखरावर थलाई सागर व शिवलिंग या पर्वत शिखरांच्या मध्ये विराजमान आहे. गिर्यारोहण जगतामध्ये 'एव्हरेस्ट' पेक्षाही चढाईसाठी हे शिखर कठीण मानले जाते. मेरू पर्वताची एकूण तीन शिखरे आहेत. उत्तर, मध्य व दक्षिण शिखर 6660 मीटर उंच आहे. मध्य शिखर 6310 मीटर उंच आहे. तर, उत्तर शिखराची उंची 6450 मीटर इतकी आहे. मध्य शिखर तिन्ही शिखरांत उंचीने कमी असले, तरी चढाईसाठी ते सर्वांत अवघड आहे.