महिलेला चपलांचा हार घालून मारहाण; विश्रांतवाडीतील प्रकार

crime
crime

पुणे; पुढारी वृत्तसेवा: यू-ट्यूबवरून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करीत शहरातील एका महिलेला चपलांचा हार घालत मारहाण करण्यात आली. हा प्रकार विश्रांतवाडी भागात घडला. यू-ट्यूब चॅनल चालविणार्‍या महिलेस तृतीयपंथीसह इतरांनी मारहाण करीत चपलांचा हार घातला. सुसंस्कृत पुण्यात घडलेल्या अशा प्रकारामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात सागर पोपट शिंदे ऊर्फ शिवलक्ष्मी संजय झाल्टे, मोहिनी हजारे, अनुजा लोहार (रा. इचलकरंजी), अश्विनी जाधव (औरंगाबाद), संजीवनी राणे (रा. कोल्हापूर) यांच्यासह इतर पाच महिला आणि एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यू-ट्यूब चॅनेल चालविणार्‍या बारामतीच्या एका महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही मूळची बारामती येथील आहे. तिचे यू-ट्यूब चॅनेल आहे. त्या समाजातील अपप्रवृत्तीबद्दल जनजागृती करीत असतात, तर यातील तृतीयपंथी संशयित आरोपी शिवलक्ष्मी हिचे देखील यू-ट्यूबवर 'महंत शिवलक्ष्मी आईसाहेब' या नावाने यू-ट्यूब चॅनेल आहे. तिला मानणारा वर्ग असून, तिच्या यू-ट्यूब चॅनेलला राज्यभरातले फॉलोअर्स आहेत.

शिवलक्ष्मी तिच्या यू-ट्यूब चॅनेलवरून अंधश्रद्धा पसरवणे, वयस्कर व्यक्तींना पाया पडायला लावणे, अशा चुकीच्या गोष्टी करीत असल्याचा व्हिडिओ तिने तिच्या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसारित केला होता. त्याचीच दखल घेत फिर्यादी यांनी त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचा व्हिडिओ बनविला होता. वाद निर्माण झाल्यानंतर त्याबद्दल फिर्यादीने संशयित आरोपींची माफीदेखील मागितली होती. परंतु, माफी मागितली असतानादेखील 23 जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी महिलेला विश्रांतवाडी येथील चौधरीनगरमधील एका इमारतीच्या टेरेसवर पुन्हा माफी मागण्यासाठी बोलावून घेतले.

तेथे तिला डांबून ठेवत आरोपींनी चपलांनी व हाताने मारहाण करून फिर्यादीच्या गळ्यात चपलांचा हार घातला. तसेच मारहाणीचा, शिवीगाळीचा, तसेच चपलाचा हार घातलेला व्हिडिओ चित्रीकरण करून तो व्हिडिओ शिवलक्ष्मीच्या यू-ट्यूब चॅनेलवर, तसेच समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. दरम्यान, फिर्यादी यांची यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बदनामी केल्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृतीयपंथी संशयित आरोपी शिवलक्ष्मी हिचेदेखील यू-ट्यूबवर चॅनेल आहे. चॅनेलवर फिर्यादी महिलेचा चपला घातलेला व्हिडिओ, तसेच माफी मागतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आमच्याकडे तक्रार आली होती. या प्रकरणात मारहाण करणे, बदनामी करणे, तसेच धमकाविल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

                                – महेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news