महावितरणचा दौंडकरांना ‘शॉक’, सातत्याने वीज खंडित; अधिकार्‍यांकडून मोघम उत्तरे

महावितरणचा दौंडकरांना ‘शॉक’, सातत्याने वीज खंडित; अधिकार्‍यांकडून मोघम उत्तरे

दौंड; पुढारी वृत्तसेवा: शहरात गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणचा नुसता नंगानाच सुरू आहे. शहरात दररोज दिवसातून सात ते आठवेळा वीज जाते. याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता कावळा चिटकला, पक्षी धडकला, अशी मोघम उत्तरे दिली जातात. परिणामी, दौंडकर वैतागले आहेत.

महावितरणच्या मनमानी कारभाराला दौंड शहरातील ग्राहक व व्यापारी पूर्णपणे वैतागले आहेत. महावितरणच्या मुजोर अधिकार्‍यांसमोर कोणाचेच काही चालेनासे दिसत आहे. महावितरणचे अधिकारी इतके मुजोर आहेत की तुम्हाला कुठे तक्रार करायची ते करा, अशी उत्तरे देतात. या मुजोर अधिकार्‍यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी का घालत आहेत, असा प्रश्न पडतो आहे.

अधिकार्‍यांचे कुठे लागेबांधे आहेत का? असा प्रश्न पडतो आहे. या प्रश्नाबाबत दौंड शहरातील सर्वच पक्षाचे नेतेही बोलण्यास तयार नाहीत. दौंड शहराच्या बाबतीत बोलायचे झाले तर अनेक कर्मचारी व अधिकारी येथे ठाण मांडून बसलेले आहे याची वरिष्ठ अधिकारी चौकशी करतील का? असा सवाल दौंडकर करत आहेत.

दौंड शहरातील वीजपुरवठा दररोज का खंडित होतो? याची वरिष्ठ अधिकारी चौकशी का करत नाहीत? इथला जबाबदार अधिकारी अधिकार्‍यांना चाप का लावत नाही, याचे गौडबंगाल मात्र गुलदस्स्तात आहे. सतत खंडित होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे दौंडच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. व्यापार्‍यांच्या नुकसानीला महावितरण जबाबदार आहे, असे व्यापार्‍यांचे मत आहे. वीजबिल थकीत असेल तर वीजपुरवठा खंडित करून बिले वसूल करतात, मग ग्राहकांना योग्य सेवा का देत नाहीत, असा सवाल पडतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news