

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी दीर्घ सुट्टी संपल्यानंतर 13 जून रोजी राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बुट, दप्तर, रेनकोट, वह्या देवून स्वागत केले जाते. मात्र, शालेय साहित्य खरेदीचे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट असल्याने खरेदीबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. नुकताच शिक्षण विभागाला पुणे जिल्हा न्यायालयाने शालेय गणवेश खरेदी ताबडतोब करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी पूर्ण शालेय साहित्य वाटपाचे नियोजन फसले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांमध्ये पहिल्या दिवशी जय्यत तयारी केलेली असते. यासाठी महापालिकेच्या वतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात येतो. याचवेळी विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. सलग दुसर्या वर्षी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना फक्त शासनानकडून दिलेली मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत.
शाळा पावसाळ्याच्या तोंडावर सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना दप्तर व पाठ्यपुस्तकांबरोबर बरोबर रेनकोटही प्राधान्याने दिला जातो. कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना इतर शालेय साहित्याची गरज भासली नाही. मात्र, यंदा दोन वर्षानी शाळा ऑफलाइन सुरू होत आहेत. आता दोन वर्षानंतर जुने गणवेश विद्यार्थ्यांना येणार का? हा देखील प्रश्न आहे.
महापालिकेच्या शाळेत जाणारा विद्यार्थीवर्ग हा बहुतांशी गरीब कुटूंबातून आलेला आहे. मोलमजुरी करून गुजराण करणार्या पालकांना आपल्या पाल्याला शिकून मोठ्या पदावर जावे ही आशा असते. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेत दाखविलेली उपस्थिती त्यांची शिक्षणाविषयी असणारी ओढ आत्मियतेचे दर्शन घडविते.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, दप्तर, रेनकोट, गणवेश आदी साहित्यांचे वाटप केले जाते. आता पावसाळ्याला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके तर मिळतील. परंतु ती पाठ्यपुस्तके पावसापासून सुरक्षित नेण्यासाठी त्यांच्याकडे दप्तरच नाही. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना इतर साहित्याबरोबर रेनकोटही मिळणे अपेक्षित होते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू होतील, तेव्हा गोरगरीब घरातील विद्यार्थ्यांना निदान रेनकोट तरी वेळेत मिळावे, ही आशा लागून आहे.
शालेय साहित्य खरेदीबाबत आम्ही बैठक घेणार आहोत. त्यावेळी आम्ही ठरवून निर्णय घेवू आणि कळवू.
-राजेश पाटील
आयुक्त, पिं.चि.महापालिका