भोसरी : पेव्हिंग ब्लॉकची दुरवस्था

भोसरी : पेव्हिंग ब्लॉकची दुरवस्था

भोसरी : परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. सध्या अनेक ठिकाणीच्या पेव्हिंग ब्लॉकची दुरवस्था झाली आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी ब्लॉक खचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने दुरवस्था झालेल्या पेव्हिंग ब्लॉक तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

भोसरी परिसरात पालिकेच्या स्थापत्य विभागाच्यावतीने पदपथावर तसेच गल्लोगल्ली पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. बसविण्यात आलेल्या ब्लॉकची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक उखडले आहेत. तर, काही ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. परिसरात दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक खचले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे.

परिसरातून ये-जा करताना नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांना अंदाज न आल्याने दुर्घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी ब्लॉकच नसल्याने पादचारी पडून गंभीर जखमी होण्याचा धोका आहे. महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने हा धोका अधिक वाढला आहे. परिसरातील दुरवस्था झालेल्या पेव्हिंग ब्लॉक त्वरित डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news