भोसरी : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे लांडेवाडी येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 14 या कार्यालयातील सब रजिस्टार गेल्या दोन महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर शासनाचा महसूलदेखील बुडत आहे. नागरिकांना तसेच वकिलांना नाहक अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भोसरीतील दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 14 कार्यालयामध्ये स्थावर मालमत्ता खरेदी विक्री मुद्रांक शुल्क भरण्याचे व्यवहार करण्यात येत असतात. भोसरी, दिघी, मोशी, चर्होली, बोपखेल, चोवीसावाडी, डूडळगाव, चिखली आदी परिसरासाठी या कार्यालयात दस्त नोंदणीसाठी हे एकच ऑफिस असल्याचे वकिलांनी सांगितले. अनेक भागांतून तसेच पंचक्रोशीतून नागरिक व वकील दस्त नोंदणीसाठी येत असतात. सुमारे दोन महिन्यांपासून खरेदी खत, साठेखत, कुलमुख्त्यार पत्र, बक्षीस पत्र, मृत्यू पत्र आदींसह इतर दस्त नोंदणी करण्यासाठी येणार्या नागरिक आणि वकिलांची गैरसोय होत आहे.
सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 14 मधील अधिकारी शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय रजेवर आहेत. त्यांच्या जागेवर काम करण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नसल्याने भोसरीतील हे कार्यालय गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 14 हे कार्यालय खासगी मालकीच्या भाड्याच्या जागेवर आहे. सुमारे दोन वर्षांचे भाडे थकल्याने जागा मालकाने या कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी टाळे ठोकण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
आता पुन्हा या कार्यालयाला अधिकारीच मिळत नसल्याने टाळे लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिक व वकिलांची हेळसांड होत असल्याने भोसरीतील हवेली क्रमांक 14 कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
या कार्यालयात सब रजिस्टर यांचा मनमानी कारभार सुरू आहे. वर्षातून कार्यालय जास्त दिवस बंदच असते. अधिकार्यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. साहेब म्हणतील त्यावेळेस कार्यालय उघडले जाते. आम्हा सर्वांना हा प्रश्न पडला आहे की कार्यालय सरकारी आहे की खासगी. आयजीआर व जेडीआर साहेबांना वकिलांचे शिष्टमंडळ जाऊन भेटले आहे. त्यांनी ऑफिस लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
– अॅड. नितीन तिडके