भोर, पुढारी वृत्तसेवा: कोविडच्या परिस्थितीपासून राज्य शासनाने गरिबांसाठी शिवभोजन थाळी योजना राबविली होती. आता भोर तालुक्यातील तीन केंद्रांपैकी दोन शिवभोजन थाळीची सेवा शासनाने बंद केली असून, एकाच ठिकाणी ही सेवा सुरू असल्यामुळे जेवणावाचून गरिबांचे हाल होत आहेत. तालुक्यात तीन ठिकाणी कोविड काळापासून 5 रुपयांमध्ये शिवभोजन थाळीची योजना राबवली होती.
त्यावेळी दिवसभर 100 ते 150 जण शिवभोजन थाळीचा लाभ घेत होते. परंतु कोविडची परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्यावर शासनाने त्या थाळीची 10 रुपये किंमत करून गरीबांना वरण, भात, दोन चपाती, भाजी हे पदार्थ देऊ लागले होते. शासन एका थाळीच्या पाठीमागे 50 रुपये अनुदान देत असताना 30 ते 40 जण जेवणाचा अस्वाद घेत असतात. मात्र, या शिवभोजन थाळीत गैरव्यवहार वाढल्यामुळे भोर प्रशासनाने त्यांची कसून तपासणी केली.
काही शिवभोजन थाळीत अनियमिता दिसून आली, तर काही ठिकाणी गरीब लाभ घेण्यापेक्षा व्यसनाधीन होऊन या योजनेचा लाभ घेऊन शिवभोजन केंद्रावर गैरप्रकार करत होते. यामुळे ही केंद्रे आठ महिन्यांपासून हॉटेल मालकांनी स्वत: बंद केली होती. पुणे-सातारा रस्त्यावरील वेळू गावात फक्त शिवभोजन थाळीचे केंद्र सुरू आहे. मात्र भोर शहरातील मध्यवर्ती ठिकाणची केंद्र शासनाने बंद केली असल्यामुळे गरिबांचे जेवणावाचून हाल होत आहेत. तरी शासनाने भोर शहरात शिवभोजन थाळी केंद्र सुरू करावे, अशी मागणी गरीब जनतेतून होत आहे.
शिवभोजन थाळी ही गरिबांसाठी शासनाने चांगली योजना राबवली आहे. मात्र कोविड परिस्थिती पूर्व पदावर आल्यावर जेवणार्याची संख्या कमी झाली, परंतु त्यामध्ये गैरप्रकार वाढू लागल्यामुळे आम्हाला ही केंद्र बंद करावी लागली. शहरात पुन्हा नवीन शिवभोजन थाळी केंद्र लवकर सुरू केली जातील.
-सचिन पाटील, तहसीलदार भोर