भोर; पुढारी वृत्तसेवा: सावत्र आईची धारदार शस्त्राने गळा कापून तसेच डोक्यात दगड घालून हत्या करणार्या शिवम अंकुश शिंदे (वय 21) याला नवी दिल्लीतून भोर पोलिसांच्या पथकाने गुरुवार (दि. 21) ताब्यात घेतले. त्याला भोर न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा अंकुश शिंदे (वय 36, रा. बाजारवाडी, ता. भोर) हिच्यासोबत अंकुश शिंदे यांनी दुसरे लग्न केले होते.
या कारणावरून अंकुश शिंदे यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा शिवम शिंदे याने रेश्मा शिंदे हिचा गळा कापून तसेच डोक्यात पाटा घालून खून केला. त्यानंतर शिवम हा फरारी झाला होता. त्याबाबत भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक दबडे करीत होते. आरोपी शिवम हा एका ठिकाणी न थांबता वेगवेगळ्या शहरात फिरत होता. कोल्हापूर, मुंबई, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, ओडिशा, मध्य प्रदेश, हरियाना असा फिरत होता. दिल्ली येथे एका स्वीट मार्टच्या दुकानात गेल्या 3 दिवसांपासून तो पार्सल पोहोच करण्याचे काम करीत होता.
तांत्रिक तपासाच्या आधारे भोर पोलिसांनी दिल्लाला जाऊन त्याला ताब्यात घेतले. नंतर भोर पोलिस ठाण्यात आणून त्यास अटक केली. त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे. त्यास भोर न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक शेळके, हवालदार विकास लगस, अजय साळुंके, दत्तात्रय खेंगरे, सायबरचे चेतन पाटील, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके यांनी केली.