

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील दुर्गम आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा अधिकचा पुरवठा केला जात आहे. तसेच पुढील आठवड्यात प्रसूतीची शक्यता असलेल्या 11 महिलांना सुरक्षित ठिकाणी रुग्णालयात हलवले जाणार आहे. विशेष म्हणजे दुर्गम आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांच्या संपर्कासाठी वॉकीटॉकीचा वापर केला जाणार आहे. गेल्या वर्षी भोर आणि वेल्हे तालुक्यातील या गावांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला होता. परिणामी, या परिसरातील रस्ते बंद होऊन काही ठिकाणी भूस्खलन झाले होते.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेला अतिपावसाचा इशारा लक्षात घेता उपाययोजना केल्या जात आहेत. महाड-भोर मार्गावरील आणि परिसरातील गावांचा दळणवळण संपर्क कायम ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. भूस्खलनापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोकांना स्थलांतरीत करता येईल, अशी सुरक्षित ठिकाणे निश्चित केली जात आहेत. त्यासाठी भूवैज्ञानिकांच्या मदतीने धोकादायक क्षेत्रे ओळखण्यात आली आहेत.