

नानगाव : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात व डोंगर भागात गेल्या काही दिवसांपासून कोसळणार्या पावसामुळे सध्या ओढे, नाले व नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वाहताना दिसून येत आहे. दौंड तालुक्यातील भीमा नदीपात्रातील पाण्याची पातळीदेखील झपाट्याने वाढत असून, नदीपात्र काठोकाठ भरून वाहत आहे.
जून महिन्यात एक-दोन छोटे-मोठे पाऊस पडले. मात्र, हा पाऊस धरणक्षेत्र व डोंगर भागात पडला नाही. त्यामुळे काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याची स्थिती दिसून येत होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावत सगळीकडे पाणीच पाणी केले आहे. सध्या डोंगर भागात व धरणक्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे खाली वाहणार्या नद्यांना व ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. पुण्यातील डोंगर भागांत आणि धरणक्षेत्रात पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे मुळा-मुठा नदीपात्राच्या प्रवाहातून भीमेच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.
भीमेच्या बागायती भागातील शेतकर्यांच्या नदीकाठी विद्युत मोटारी आहेत. सध्या नदीपात्रातील पाणीपातळी वाढत असल्यामुळे शेतकरी या विद्युत मोटारी काढण्याच्या कामात मग्न आहेत.