भिगवणकरांची पाणी समस्या मिटणार; जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर

भिगवणकरांची पाणी समस्या मिटणार; जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर
Published on
Updated on

भिगवण; पुढारी वृत्तसेवा: भिगवणकरांची पाणीटंचाई हटविण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत भिगवण पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यासाठी तब्बल 29 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबतची माहिती भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली. सरपंच तानाजी वायसे, पराग जाधव, उपसरपंच शीतल शिंदे, संजय देहाडे, बाळासाहेब भोसले, स्वाती धवडे आदी या वेळी उपस्थित होते.

भिगवणची लोकसंख्या 30 हजाराच्या पुढे असून सन 2054 सालची लोकसंख्या गृहीत धरून ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेसाठी 29 कोटी 75 लाख 31 हजार आठशे रुपये मंजूर झाले आहेत. त्यानुसार योजनेचा उद्भव उजनी धरण आहे. प्रति माणसी दैनंदिन 55 लिटर पाणी पुरवठा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. यासाठी 2 कोटी 97 लाख 53 हजार 180 रक्कम लोकवर्गणीतून भरायची आहे.

भिगवण जवळील मदनवाडी गावासाठीही 15 कोटी रुपये खर्चाची जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजुर झाली आहे.
उजनी पुनर्वसित भिगवण गावाला बारमाही टंचाई जाणवत आली आहे. गेल्या पंधरा वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणाने सन 2036 ची लोकसंख्या गृहीत धरुन पाणी योजना राबविली. या बरोबरच इतरही योजना राबविण्यात आल्या. परंतु, या योजनांतून अपेक्षित पाणीपुरवठा गावाला झाला नाही. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न सुटला नाही. जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर झालेल्या या योजनेमुळे भिगवणची पाणी टंचाई हटण्याचा विश्वास पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

विकासाची वाट सुकर…
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठपुरव्याने ही योजना मार्गी लागल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. या योजनेमुळे स्वर्गीय रामेशबापू जाधव यांचे स्वप्न पूर्ण होईल असेही मत पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. या योजनेसाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेही सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले. गावाच्या विकासात पूर्वी आडकाठी घातली जात होती. आता राज्य सरकार बदलल्याने विकासाची वाट सुकर झाल्याचे सरपंच तानाजी वायसे व पराग जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news