बेशिस्त वाहनचालकांना वेसण; स्वारगेट चौकात सर्व यंत्रणांची एकत्रित पाहणी

बेशिस्त वाहनचालकांना वेसण; स्वारगेट चौकात सर्व यंत्रणांची एकत्रित पाहणी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: स्वारगेट चौकात सातत्याने भेडसावत असलेला वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटत असून, शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास सर्व यंत्रणांनी येथे एकत्र येत पाहणी केली. या वेळी केलेल्या पाहणीनंतर त्यांनी बेशिस्त ट्रॅव्हल्स, रिक्षा आणि अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली.

पीएमपी, एसटी, आरटीओ, महापालिका अतिक्रमण विभाग, पोलिस प्रशासन, वाहतूक पोलिस यांनी एकत्र येत स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत गुरुवारी चर्चा केली अन् दुसर्‍या दिवशी शुक्रवारी स्वारगेट चौकात पाहणी केली. त्यानंतर येथे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्‍या काही समस्यांवर तत्काळ कारवाई करायला सुरुवात केली.

उर्वरित मोठ्या समस्यादेखील लवकरच सोडविण्याचे नियोजन या वेळी करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक (वाहतूक) प्रवीण भोपळे उपस्थित होते. तर, महापालिकेच्या पथ विभागाचे उपअभियंता मनोहर शिंदे, एसटीच्या अधिकारी पल्लवी पाटील आणि अतिक्रमण, पीएमपीचे अधिकारी उपस्थित होते.

कारवाईत सातत्य हवेच

स्वारगेट चौकात बेशिस्त वाहनचालकांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे इतर वाहनचालकांना येथून जाताना नाकीनऊ येतात. सध्या वाहतुकीच्या सर्व यंत्रणांनी एकत्र येत कारवाई केली. मात्र, ही कारवाई धरसोड नसावी. तसेच, येथील कारवाईत सातत्य राहिले, तरच आगामी काळात येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे आणि स्वारगेट चौकाला मोकळा श्वास घेता येणार आहे.

रिक्षा, अतिक्रमणांवर कारवाई

शंकरशेठ रोडवरील एसटीच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमणे, हातगाड्या या वेळी हटविण्यात आल्या. याच प्रवेशद्वाराशेजारी एक रिक्षाथांबा नुकताच देण्यात आला आहे. येथील अस्ताव्यस्त लागलेल्या रिक्षा या वेळी जप्त करण्यात आल्या. तसेच, येथील रिक्षांवर आणखी कारवाई करण्यात येणार आहे.

खासगी ट्रॅव्हल्स गाड्या जप्त

स्वारगेट चौकात रस्त्यातच लागणार्‍या ट्रॅव्हल्स गाड्यांमुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे येथे लागलेल्या ट्रॅव्हल्स बसदेखील शुक्रवारी झालेल्या पाहणीनंतर जप्त करण्यात आल्या. यात रिक्षांवरदेखील कारवाई करण्यात आली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news