बेल्हेत अवैध व्यवसाय जोमात; तरुणांसह शालेय विद्यार्थीही याकडे वळले

बेल्हेत अवैध व्यवसाय जोमात; तरुणांसह शालेय विद्यार्थीही याकडे वळले

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: साकोरी, आणे, राजुरी, निमगाव सावा, पारगाव, औरंगपूर परिसरात जुगार, मटका आदी अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहेत. तरुणांसह शालेय विद्यार्थीही याकडे वळू लागले आहेत. नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे यांनी निमगावसावा परिसरात छापा घातल्यानंतर परिसरातील सर्व अवैध धंदेवाल्यांनी आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले होते. मात्र, आता निमगावसावा येथे एका मटका व्यावसायिकाने चिठ्ठयावर मटक्याचे आकडे घेण्याऐवजी मोबाईलवरून आकडे घेऊन व्यवसाय सुरू ठेवल्याचे बोलले जाते. सध्या साकोरी येथे जिल्हा परिषदेच्या आणि हायस्कूल शाळेजवळ चिठ्ठीवरील मटका व्यवसाय सुरू आहे.

औरंगपूर शिवारात किस्मत नावाच्या धाब्यावर सुरू असलेला मटका आणि भेसळयुक्त ताडी व्यवसाय जोमाने सुरू आहे. बोरी खुर्द गावातील पाण्याच्या टाकीजवळही मटका जुगार, तसेच भेसळयुक्त ताडी व्यवसाय जोमाने सुरू आहे. या व्यावसायिकांना काही अधिकार्‍यांचा कृपाशीर्वाद असल्याचे बोलले जाते. निमगावसावा परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती जुगार खेळण्यासाठी बसतात. तसेच, आळेफाटा येथे कल्याण-मुंबई मटका मोठ्या प्रमाणात खेळला जात असून, या मटका व्यवसायाकडे तरुणांबरोबर शालेय विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात वळाल्याने,पालकवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

पोलिस पथकाला काहीच सापडले नाही
या प्रकाराबाबत नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे यांच्याशी संपर्क साधला असता,ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बेल्हे येथे छापे टाकण्यासाठी पोलिस पथक गेले होते, पण तेथे काहीच आढळून आले नसल्याने सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news