बेल्हे परिसरात पावसाने पूर; रस्त्यांची चाळण, जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास सुरू

बेल्हे परिसरात पावसाने पूर; रस्त्यांची चाळण, जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास सुरू

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: बेल्हे, राजुरी, बांगरवाडी परिसरात बुधवारी (दि. 31) रात्री झालेल्या संततधार पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर आले. पुराचे पाणी ओढ्याच्या पात्रात न मावल्याने ओढ्यालगतच्या दुकानांत शिरले. काही ठिकाणी रस्त्यावरून वाहिल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. बुधवारी रात्री परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने आलेल्या पुरामुळे बांगरवाडी ते बेल्हेदरम्यान एका ठिकाणी रस्ता वाहून गेला. त्यामुळे तेथे मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी पंचाईत झाली.

काही नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करीत आहेत. मात्र, पावसाचा जोर वाढला व रस्त्यावरून पाणी वाहायला लागले, तर रात्री-अपरात्री वाहून गेलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांसह वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. बेल्हे-बांगरवाडी या मार्गावर बांगरवाडीतील ग्रामस्थ दैनंदिन अथवा शेतीकामांसाठी ये-जा करीत असतात. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे या मार्गावरील नाल्याजवळील अर्धापेक्षा अधिक रस्त्याचा भाग वाहून गेला.

परिणामी परिसरातील नागरिक व वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली. त्यांना आता इप्सित स्थळी पोचण्यासाठी फेरा मारावा लागणार आहे. गेल्या वर्षी ज्या ठिकाणचा रस्ता वाहून गेला, त्या ठिकाणचा व आसपासचा रस्ता खराब झाला होता. त्या वेळी संबंधित विभागाने फक्त थातूरमातूर काम करून दुरुस्ती केली होती. पाण्याचा निचरा होणे आवश्यक असून दर वर्षी पावसाळ्यात या रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहत आसपासच्या शेतशिवारात घुसते.

बेल्हे ते बांगरवाडीदरम्यान दोन नाले येतात. गुळुंचवाडी शिवारात दोन तर गुंजाळवाडी शिवारात तीन ओढे-नाले येतात. राजुरी गावच्या शिवारात चार ओढे येतात. अपवाद वगळता या सर्व नाल्यांतील पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नाही. चांगला पाऊस झाल्यावर पाणी रस्त्यांवरून व्यापारी गाळ्यांसह शेतशिवारात शिरते. नागरिक व शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news