पौड : पुढारी वृत्तसेवा: मुळशी तालुक्यातील पिंपरी पॉइंट येथून बेपत्ता झालेल्या ओमकार विजय शेटे (वय 22, रा. खडकमाळ आळी, शुक्रवार पेठ, पुणे) याचा आठ दिवस शोध घेऊनही शोध लागेना. अंदरबन ट्रेकसाठी फिरायला जात असल्याचे सांगून ओमकार शनिवारी (दि. 18) सकाळी सात वाजता निघून गेला. तो परत घरी न आल्याने त्याचे वडील विजय शेटे यांनी तो बेपत्ता झाल्याबाबत पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ओमकारची दुचाकी पिंपरी दरी पॉइंटजवळ पोलिसांना मिळून आली. ओमकारचा शोध पौड, खडक पोलिस ठाणे, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळा, रायगड आपत्ती व्यवस्थापन भिरा तसेच वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ घेत आहेत.
ओमकारचा गेले आठ दिवस पिंपरी सेल्फी पॉइंट, डोंगरावर व खालच्या बाजूला, अंदरबनचे जंगल पार करून हिरडीपर्यंत शोध घेण्यात आला. या शोधकामी दररोज 20 ते 25 जण कार्यरत आहेत. या शोधकार्यादरम्यान एक मेलेले वासरू, तर एक जिवंत झाडात अडकलेले वासरू व्यवस्थापन टीमला आढळून आले. ओमकारच्या शोधकामी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलिस उपनिरीक्षक राहुल घाडगे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे, संतोष कुंभार, पोलिस नाईक राँकी देवकाते, सिध्देश पाटील, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे, शिवदुर्ग लोणावळाचे सुनील गायकवाड, भिरा व्यवस्थापनाचे शेलारमामा, निवेचे पोलिस पाटील गणेश निवेकर, वांद्रेचे पोलिस पाटील संतोष गोरे, वडील विजय शेटे तसेच वीस ते पंचवीस जण दररोज कार्यरत आहेत.
ओमकार शेटे याच्याबद्दल कोणाला काही माहिती मिळाल्यास पुढील नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन पौड पोलिसांकडून करण्यात आले आहे. अशोक धुमाळ, पोलिस निरीक्षक, पौड पोलिस स्टेशन फोन नंबर : 9923419799; विनायक देवकर, सहायक पोलिस निरीक्षक पौड पोलिस स्टेशन फोन नंबर 7350758700; राहुल घाडगे, पोलिस उपनिरीक्षक खडक पोलिस स्टेशन 9923107820; सचिन शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक पौड पोलिस स्टेशन 9823426620.
हेही वाचा