पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीचा निकाल जाहीर केलेला नाही. तरीदेखील बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याची तक्रार विविध संघटनांनी विद्यापीठाकडे तक्रार दाखल केली आहे. राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यावर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, सीबीएसई आणि अन्य मंडळांचा निकाल जाहीर झालेला नसल्याने अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय विद्यापीठासह बहुतांश महाविद्यालयांनी घेतला.
तसेच आवश्यकतेनुसार महाविद्यालयांना दहा टक्के अतिरिक्त जागांना मान्यता देण्याचीही तयारी विद्यापीठाकडून दर्शवण्यात आली. मात्र, सीबीएसईचा निकाल जाहीर झालेला नसल्याने बीएमसीसीने दहावीचे गुण आणि प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवली. पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पात्रता बारावी उत्तीर्ण ही असते. मात्र, बीएमसीसीमध्ये बारावीच्या गुणांऐवजी दहावीचे गुण आणि प्रवेश परीक्षेचे गुण ग्राह्य धरून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाकडे या संदर्भात लेखी तक्रार दाखल केली असल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. सुरेश खुरपे यांनी दिली.
या संदर्भात महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षेच्या आधारे राबवली जाते. त्यात प्रवेश परीक्षेसाठी 60 गुण, दहावीसाठी वीस गुण आणि बारावीसाठी वीस गुण असा गुणभार असतो. यंदा सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर झालेला नसल्याने बारावीचा गुणभार दहावीला देण्यात आला. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, बीएमसीसीमधील प्रवेश प्रक्रियेबाबत संबंधित प्राचार्य आणि प्रवेश समिती सदस्यांकडे विचारणा करण्यात आली आहे. त्यांच्याकडून याबाबत स्पष्टता आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले.