बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती शहराबाहेरील रिंगरोडची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडला असून, धोकादायक खड्डे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. रस्त्यावरील डांबर गायब झाले असून खडी रस्त्यावर आली आहे. त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बारामती शहराबाहेरील रिंगरोडचा मोठा गाजा-वाजा झाला होता. मात्र, सध्या या रस्त्यावर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्ता उखडणे, डांबर गायब होण्याबरोबरच बहुतांश ठिकाणी चेंबरही उघडे पडले आहेत. शहर आणि उपनगरांत अजूनही जोरदार पाऊस झाला नाही. मात्र, केवळ रिमझिम पावसानेच शहरातील रस्त्यांवरील खड्डे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघात होऊन लोकांच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. शहराबाहेरील बहुतांश रस्त्यावर हीच अवस्था आहे. पावसाचे वातावरण बघून तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी बारामतीकर करत आहेत.
शहरातील महत्त्वाचे चौक, वर्दळीचे रस्ते, बायपास रस्ते यांचीही दुरवस्था झाली आहे. बाह्य मार्गावर ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या धोकादायक पद्धतीने रस्त्यावर आल्या आहेत. जडवाहनांना त्या अडथळा आणतात, यासाठी अशा झाडांच्या फांद्याही हटवण्याची गरज आहे. शहरातील काही भागातील चेंबर उघडे असून, त्यावरून वाहनचालकांचा प्रवास सुरू आहे, याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. शहरात हजारो प्रकारची झाडे लावली आहेत; मात्र झाडांच्या बाजूला बसवलेले पेव्हर ब्लॉक उखडले गेले आहेत, त्याची दुरुस्ती करण्याची मागणी बारामतीकर करत आहेत. पाणी साठण्याच्या जागा शोधून त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
शहरांतर्गत विविध नगरांत जाणार्या रस्त्यांचीही अशीच अवस्था झाली आहे. दुभाजकांची ठिकठिकाणी दुरुस्ती सुरू आहे, मात्र खड्डेही बुजवण्याची गरज आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसामुळे खड्ड्यात पाणी साठते पर्यायाने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरण्याचा, अपघात होण्याचा धोका आहे.