बारामती : पुढारी वृत्तसेवा: बारामती शहरात निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झालेले असल्याने यंदा वारकर्यांनी कालव्यामध्ये अंघोळ किंवा कपडे धुण्यासाठी उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. निरा डावा कालव्यावर ज्या पाच-सहा ठिकाणी घाट तयार केलेले आहेत, त्याच ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळून वारकर्यांनी उतरावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
यासंदर्भात कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर म्हणाले की, निरा डावा कालव्याचे बारामती शहरात बहुतांश ठिकाणी अस्तरीकरण झालेले आहे. अस्तरीकरणामुळे कालव्यात माणूस पडला, तर त्याला पुन्हा भराव चढून काठावर येणे अवघड होते.
गेल्या काही दिवसांत काही जणांचा कालव्यात पडून मृत्यूही झाला आहे. वरून पाणी कमी वाटत असले, तरी निरा डावा कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहाला कमालीचा वेग आहे. अस्तरीकरणाने हा वेग अधिक वाढला आहे, त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जलसंपदा विभागाने वारकर्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. निरा डावा कालव्यावर पाच ते सहा ठिकाणी पायर्या असलेले घाट आहेत. या घाटांच्या ठिकाणीच वारकर्यांनी अंघोळ किंवा कपडे धुण्यासाठी उतरावे. तेथेही पुरेशी काळजी घ्यावी, असे धोडपकर यांनी सांगितले.
विसर्ग कमी करणार वारकर्यांच्या सुरक्षिततेसाठी निरा डावा कालव्याच्या पाण्याचा विसर्ग कमी केला जाणार आहे; जेणेकरून नजरचुकीने कुणी कालव्याच्या पाण्यात पडले, तरी ती व्यक्ती बुडता कामा नये, याची काळजी घेतली जाणार आहे. वारकर्यांची गैरसोय होणार नाही, हेही यात पाहिले जाईल. दरम्यान, निरा डावा कालव्यावर काही ठिकाणी जलसंपदा विभागाने फ्लेक्स लावून जनजागृतीही
केली आहे.