

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती नगर परिषद निवडणुकीची इच्छुकांकडून जोरदार तयारी केली जात असताना राज्य सरकारने थेट
जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला असल्याने या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा हिरमोड झाला आहे. बारामती पालिकेच्या गत निवडणुकीत येथील नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाली होती. त्या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या पदावर पौर्णिमा तावरे यांना संधी दिली होती. यंदा निवडणुकीनंतर नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जाईल. त्यात कदाचित आपलाही क्रमांक लागू शकेल, अशी अटकळ बांधत अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली होती. परंतु, गुरुवारी (दि. 14) रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सगळी गणिते बदलून गेली आहेत.
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. तरीही गत निवडणुकीत चार जागी विरोधकांनी जोरदार मुसंडी मारली होती. विरोधकांच्या काही जागा अगदी नगण्य मताने गेल्या होत्या. राष्ट्रवादीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला होता. यंदा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालिका निवडणुकीसाठी पदाधिकारी, कार्यकत्र्यांचा नुकताच मेळावा घेत तयारी सुरू केली. शिवाय पालिकेतील सर्व 41 जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आल्याच पाहिजेत, असे आवाहन केले होते.
त्यानंतर इच्छुकांकडून राष्ट्रवादी भवनात पक्षाकडून अर्ज घेतले जात असताना अचानक बुधवारी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय आल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी पडले आहे. दरम्यान, बारामती पालिकेची निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्णय भाजपने यापूर्वीच घेतला आहे. परंतु, बारामतीत राष्ट्रवादी हा प्रमुख विरोधक असणारे स्थानिक आघाड्या करून निवडणुकीला सामोरे जातात. यंदा त्या पार्श्वभूमीवर काय निर्णय होतो, याकडेही लक्ष लागले आहे.
आरक्षणाकडे लक्ष
नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने इच्छुकांचे लक्ष आता आरक्षणाकडे लागले आहे. ओबीसी आरक्षण सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे. त्यावर 19 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक तोंडावर आली आहे. तत्पूर्वी तत्काळ आरक्षण कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.