

बारामती; पुढारी वृत्तसेवा: धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गाच्या आरक्षणप्रश्नी बारामती येथे दि. 29 जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी 29 जुलै 2014 रोजी धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ते मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. राज्यातील नव्या सरकारने याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचा आग्रह धरणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले. यासंदर्भात ढोणे यांनी बारामतीच्या प्रांताधिकार्यांना निवेदन दिले आहे.
धनगर समाज अनेक वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणासाठी संघर्ष करतो आहे, मात्र, समाजाला आजवर न्याय मिळालेला नाही. याप्रश्नी एका बाजूला समाज प्रबोधन करत असताना दुसर्या बाजूला शासनाला कृतिशील भूमिका घेण्यास आम्ही भाग पाडत आहोत. त्याचाच भाग म्हणून बारामती येथील प्रशासकीय इमारतीसमोर दि. 29 जुलै रोजी 11 वाजता धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणप्रश्नी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, तातडीने मंत्री समिती स्थापन करावी, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत दिलेल्या आश्वासनाचा कृती कार्यक्रम जाहीर करावा, न्यायालयीन लढ्यासाठी राज्य शासनाने सुस्पष्ट प्रतिज्ञापत्र दाखल करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात येणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.