

बारामती; पुढारी वृत्तसेवा: सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पथकाने छापे टाकले. बुधवारी (दि. 17) रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. सोमेश्वर कारखान्याजवळ ऑनलाइन बिंगो मटक्यावर कारवाई सोमेश्वर कारखान्याजवळ एका बंदिस्त स्लॅबच्या खोलीत सुरू असलेल्या ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकार्यांचे पथक व वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. या कारवाईत 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाईल व अन्य साहित्य असा सुमारे 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी महादेव साळुंखे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, समाधान साधू वारकड, संदीप बापूराव चौरे, संतोष दत्तात्रय गायकवाड, सुनील आत्माराम गायकवाड, चंद्रकांत जग्गनाथ रिठे (सर्व रा. करंजेपूल, ता. बारामती), अनिल बाबूराव जाधव, सचिन रोहिदास शिंदे, अजित गजानन येळे (रा. करंजे, ता. बारामती), गणेश जयवंत संकपाळ (रा. मुरुम), दादा जगन्नाथ दगडे (रा. निंबूत), अशोक शिवाजी दडस (रा. वाघळवाडी), संभाजी बाबूराव मगर (रा. मगरवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणी बिंगो नावाचा ऑनलाइन जुगार खेळला जात होता. पोलिसांनी जुगारासाठी वापरला जाणारा सीपीयू, मॉनिटर, की-पॅड, माऊस यांसह रोख रक्कम जप्त केली. रिठे याच्याकडून हा जुगार खेळविला जात होता.
वाघळवाडीत दारू विक्रीप्रकरणी चौघांवर गुन्हा
वाघळवाडी गावच्या हद्दीत सोमेश्वर कारखान्याजवळ निरा डावा कालव्याच्या जवळ हातभट्टी विक्री करणार्या चौघांवर या पथकाने कारवाई केली. याबाबत महादेव नामदेव साळुंखे या पोलिस कर्मचार्याने फिर्याद दिली. त्यानुसार, पंकज सुहास पाटील, किशोर मधुकर आमटे, गिरीश प्रवीण मचले (रा. मुरुम, ता. बारामती) व कपिल किसन नलवडे (रा. कन्नडवस्ती, वाघळवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणाहून गावठी दारूचे 30 फुगे पोलिसांनी जप्त केले.
निंबुतच्या कारवाईत दोघांवर गुन्हा
निंबुत (ता. बारामती) येथील निरा कॉर्नर येथे कल्याण मटका घेणार्या दिलीप भगवान भिंगारे (रा. वॉर्ड नंबर 6, निरा, ता. पुरंदर) व मटका चालक सयाजी राजाराम पवार या दोघांविरोधात मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक तुषार भोर व कर्मचार्यांकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अमोल मारुती भोसले या पोलिस कर्मचार्याने फिर्याद दिली. पोलिसांची चाहूल लागताच सयाजी पवार हा तेथून पसार झाला. भिंगारे हा पोलिसांच्या हाती लागला. या ठिकाणाहून पोलिसांनी रोख रकमेसह दोन हजारांचे साहित्य जप्त केले.