जागतिक वसुंदरा दिन :बाप रे..! महासागरात प्लास्टिकचे डोंगर; समुद्राच्या जीवसृष्टीला धोका

जागतिक वसुंदरा दिन :बाप रे..! महासागरात प्लास्टिकचे डोंगर; समुद्राच्या जीवसृष्टीला धोका
पुणे : जगातील सर्वच महासागरांच्या पोटात मानवनिर्मित प्लास्टिकच्या कचर्‍याचे मोठे डोंगर तयार झाले आहेत. त्यामुळे समुद्राखालची मोठी जीवसृष्टी नामशेष होत आहे. जमिनीवरच्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. आकाशात उडणार्‍या हजारो पक्ष्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे 2040 पर्यंत 60 टक्के प्लास्टिकचा वापर कमी करावा, अशी आर्त हाक यंदाच्या जागतिक वसुंधरादिनी  संयुक्त राष्ट्र संघाने जगाला दिली आहे.
दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा होतो. 1970 पासून जगभर हा दिवस साजरा  होतो. या दिवशी आपली पृथ्वी वाचविण्यासाठी काय करता येईल त्यानिमित्त जगभरातील पर्यावरणरक्षण करणार्‍या संस्था एकत्र येऊन काम करतात. यंदा 2040 पर्यंत 60 टक्के प्लास्टिकचा वापर कमी करा, अशी थीम पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. पृथ्वीवर सुरू असलेली बेसुमार जंगलतोड, वाढते प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढलेला प्लास्टिकचा वापर, ही सर्वांत मोठी समस्या मानवाने पृथ्वीसमोर उभी केली आहे.

पक्षीही बांधत आहेत प्लास्टिकची घरटी…

पर्यावरणतज्ज्ञांच्या अभ्यासानुसार आता पक्षीदेखील त्यांची घरटी बांधण्यासाठी प्लास्टिकचे धागे, टाकाऊ वस्तूंचा वापर करीत आहेत; इतका प्लास्टिकचा कचरा आपल्या अवतीभोवती झाला आहे.
आपण आपल्या घरापासून प्लास्टिक कमी करून पृथ्वीचे रक्षण करू शकतो. प्लास्टिकच्या कुंड्यांऐवजी मातीच्या कुंड्या वापराव्यात. बाजारात जाताना मी पॉलिथीन बॅग घेणार नाही, असा संकल्प करावा. मी पुणे शहरात त्यावर गेल्या 4 वर्षांपासून काम करीत आहे. शाळेत या विषयावर सातत्याने प्रशिक्षण दिले, तर निदान पुढच्या पुढीत त्याचा प्रसार-प्रचार होईल.
– भाविशा बुद्धदेव, पर्यावरण कार्यकर्त्या
माशांच्या जाती नामशेष 
मानवाने टाकलेला प्लास्टिकचा कचरा नदी-नाले आणि शेवटी महासागरात जात आहे. त्यामुळे अनेक माशांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. समुद्राखालची मोठी जीवसृष्टीच प्लास्टिक संपवत आहे. हजारो माशांच्या जाती नामशेष झाल्याचा अहवाल अमेरिकेतील विद्यापीठांनी दिला आहे.

प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक

संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार, जगातील सर्वच महासागराच्या पोटात मोठे प्लास्टिकचे डोंगर आहेत. त्यामुळे आता प्लास्टिकचा वापर मर्यादित करा, अशी हाक यंदा त्यांनी दिली आहे. समुद्राखालची जीवसृष्टी धोक्यात आहे. त्याचा अहवाल भयंकर आहे. पाण्याखालच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच पृथ्वीवरच्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जाऊन जनावरे मरत आहेत. यात सर्वाधिक गायी, म्हशी, जंगलातील प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जात आहे.

मानवासमोरील मुख्य आव्हाने

  • प्लास्टिकचा वापर कमी करणे
  • वाढती जंगलतोड थांबविणे
  • जल, वायुप्रदूषण कमी करणे
  • हवामानबदल, समुद्राची वाढती पातळी
  • किनारपट्टीवरचे वाढते धोके
  • पूर, चक्रीवादळ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news