बँकांच्या ‘एटीएम’ला ‘ऑनलाईन’मुळे घरघर

बँकांच्या ‘एटीएम’ला ‘ऑनलाईन’मुळे घरघर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळात बँकेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सहजरीत्या मोबाईल बँकिंग व ऑनलाइनद्वारे होऊन आता ते सर्वांच्याच सवयीचे झाले आहेत. त्याचा परिणाम आता बँकांच्या एटीएममधील व्यवहार घटण्यावर होऊन ग्राहकांचे प्रत्यक्षात रक्कम बाळगण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. कालांतराने एटीएमची संख्याही घटण्याची शक्यता बँकिंग क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे.
कोरोना काळात सर्वच क्षेत्रे अडचणीत आली.

त्यामध्ये अडचणीतही संधी मानून अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापारात वेगवेगळे प्रयोग राबविण्यात आले. आयटी क्षेत्रापासून अनेक व्यवसायांत आलेली 'वर्क फ्रॉम होम'ची संकल्पना प्रत्यक्षात अन्य कार्यालयांमध्येही रुजली व त्यामध्येही तग धरून सर्वच क्षेत्रे आता पूर्वपदावर आल्याचे दिसून येत आहे. बँकांमध्ये रक्कम भरणे आणि काढण्यासाठी ग्राहकांच्या तासन् तास रांगा लागल्याचे चित्र बँकांच्या एटीएमच्या सुविधांमुळे इतिहासजमा झाले.

बहुतांश बँकांची शाखा तिथे एटीएम आणि इतरत्रही विशेषतः व्यापारी व सरकारी बँकांच्या एटीएमचे जाळे सर्वत्र पाहावयास मिळते. ग्रामीण भागात तालुक्याची ठिकाणे आणि आठवडे बाजाराच्या महत्त्वाच्या शहरांमध्येही दिमाखात उभी असणारी एटीएम म्हणजे ग्राहकांना हव्या त्या वेळी रक्कम मिळण्याची मोठी सोय आहे. मात्र, मोबाईल बँकिंग, ऑनलाइन व्यवहार, क्यूआर कोडचा वाढता वापर कोरोना साथ ओसरल्यानंतरही वाढत चालला आहे

फुटपाथवरील भाजीविक्रेत्यांसह सर्व व्यावसायिकही 'क्यूआर कोड'चा वापर करीत आहेत. त्यामुळे जे बँकिंग साक्षर नव्हते असे नवे ग्राहकही बँकिंगच्या प्रवाहात आले असून, ते दोघांच्याही फायद्याचे आहे. भविष्यात ऑनलाइन बँकिंग वाढत जाणार असून, बँकांची एटीएम केंद्रेही रक्कम भरणे आणि काढणे यासाठी कायम राहणार असली, तरी सध्या असलेली एटीएमची संख्याही जागाभाडे व अन्य खर्च विचारात घेता मर्यादित करावी लागेल.

– अ‍ॅड सुभाष मोहिते, अध्यक्ष, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 294 शाखचे 113 एटीएम आहेत. पूर्वीच्या तुलनेत एटीएममधील व्यवहार कमी होऊन ऑनलाइन बँकिंगवर तरुणवर्ग अधिक भर देत आहे. एटीएम केंद्राची जागा, त्या ठिकाणचा ग्राहकांचा प्रतिसाद याचा आम्ही लवकरच फेरआढावा घेणार आहोत.

– प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, चेअरमन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news