प्रोत्साहनपर लाभापासून एकही शेतकरी वंचित नको; सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या बँकांना सूचना

प्रोत्साहनपर लाभाच्या पुणे, कोल्हापूर आणि कोकण विभागाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सहकार आयुक्त अनिल कवडे व उपस्थित मान्यवर.
प्रोत्साहनपर लाभाच्या पुणे, कोल्हापूर आणि कोकण विभागाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सहकार आयुक्त अनिल कवडे व उपस्थित मान्यवर.
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना पन्नास हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या योजनेपासून राज्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशा सूचना सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी शुक्रवारी आयोजित प्रशिक्षण बैठकीत बँका व सहकार विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.19) महत्त्वपूर्ण बैठक झाली.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अपर निबंधक ज्ञानदेव मुकणे, नागनाथ येगलेवाड, मुंबई जिल्हा उपनिबंधक पंकज जेबले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षण बैठकीस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड, पालघर या दहा जिल्ह्यांतील (पुणे, कोल्हापूर आणि कोकण विभाग) राष्ट्रीयकृत व इतर बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे प्रतिनिधी आणि सहकार विभागातील अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

शासनाच्या 29 जुलै 2022 च्या आदेशानुसार प्रोत्साहनपर लाभासाठी शेतकर्‍यांची पीक कर्जाबाबतची माहिती ऑनलाईनद्वारे भरण्याबाबतचे मार्गदर्शन आणि भेडसावणार्‍या अडचणी व शंकाचे निरसन यावेळी आयुक्तांनी केले. तसेच प्रोत्साहनपर लाभ योजनेत राज्यातील सर्व पात्र शेतकर्‍यांच्या अंतिम याद्या 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सहकार विभागाने ठेवले आहे.

बैठकीनंतर माहिती देताना अपर निबंधक ज्ञानदेव मुकणे म्हणाले, 'प्रोत्साहनपर लाभ शेतकर्‍यांना देण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तथा स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार (एसओपी) शेतकर्‍यांच्या याद्या तयार करणे आणि शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व माहिती संबंधित बँकांनी महाऑनलाईनवर बिनचूक भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांनी त्याची तपासणी पूर्ण करावयाची आहे. सहकार आयुक्तांच्या उपस्थितीत पुढील प्रशिक्षण कार्यक्रम हा शनिवारी (दि.20) अहमदनगर आणि नागपूर येथे सोमवारी (दि.22) होणार आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news