वर्षा कांबळे :
पिंपरी : सध्याच्या प्री वेंडिंगच्या जमान्यात मध्यमवयीन जोडप्यात पोस्ट वेडिंग शूटची क्रेझ निर्माण झाली आहे. लग्नाला 10 ते 15 वर्षे पूर्ण झालेले दाम्पत्य सिनेमांच्या गाण्यावर व्हिडिओ बनवत असून, याला नागरिकांच्याही चांगल्या कमेंटस मिळत आहेत. सिनेमातील गाणी पाहून प्रत्येकाला असे वाटत असते, की आपल्यावरदेखील असे गाणे चित्रित व्हावे. ही कसर आता प्री वेडिंग शूटच्या निमित्ताने तरूण जोडपी पूर्ण करत आहेत. मात्र, अनेकांची लग्न प्री वेडिंग शूट हा पर्याय येण्यापूर्वी झाली आहेत. त्यांच्यासाठी पोस्ट वेडिंग हा नवीन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
मध्यमवर्गीय जोडप्यामध्ये आता पोस्ट वेडिंग किंवा आफ्टर रिटायरमेंट शूट करण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनस्क्रिन नटनट्यांप्रमाणे सिनेमांच्या गाण्यावर व्हिडीओ बनविले जात आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपण सिक्रनसमोर छान दिसावे आणि आपला एक मेमोरिबल व्हिडीओ असावा असे वाटत असते. प्री वेडिंग हे खूप कॉमन झाले आहे. आता सध्या चाळीशी पुढील वयोगटातील जोडप्यांचा यामध्ये समावेश आहे. हे व्हिडीओ यु ट्युबवर व्हायरल होत असतात. त्यामुळे त्यांची तरूण मुले, नातवंडे कायमस्वरूपी पाहू शकतात.
प्रत्येक व्यक्ती ही अभिनय संपन्न नसते.
या वयात थोडं पोट सुटलेलं असते, वजन वाढलेले असते, जबाबदार्या थोड्या कमी झालेल्या असतात. त्यामुळे व्हिडीओग्राफरला त्यांच्याकडून हे सर्व करुन घ्यावे लागते. व्हिडीओ बनविताना त्यांना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जाते. कारण नवरा बायको जरी असले तरी प्रत्यक्ष व्हिडीओ करताना नॉन अॅक्टरकडून काम करुन घेताना तेच हावभाव येतातच असे नाही; पण या व्हिडीओला अनेक जण पाहणर असल्याने व्हिडीओ छान करण्याचे आव्हान असते.
चार लाखांपर्यंत खर्च
यू ट्यूबवर व्हिडीओ टाकल्यानंतर त्याला येणार्या कमेंट्स चांगल्या आल्या पाहिजेत अशी अपेक्षा असते. हे व्हिडीओ 25 ते 30 हजारांपासून सुरू होत असून, 3 ते 4 लाखांपर्यंतदेखील पोस्ट वेडिंग केली जाते. यामध्ये 25 हजारांचा व्हिडीओ असो किंवा 4 लाखांचा त्या व्यक्तीच्या हौसेला आणि आनंदाला मोल नसते.
पोस्ट वेडिंग शूट ही संकल्पना खूप स्वागतार्ह असते. तिच्याकडे कोणी फनी अँगलने पाहू नये असे मला वाटते. वेगवेगळ्या ठिकाणी जावून शुटिंग केल्याने आपल्यातील एका कलाकारालाही स्कोप मिळतो. त्या व्यक्तीला त्याची ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात मिळालेली एक ट्रिट असते.
-देवदत्त कशाळीकर, संचालक, देवदत्त फोटोग्राफी स्कूल