

दिनेश गुप्ता/आशिष देशमुख
पुणे : पुणे शहरात विधानभवनासमोर सव्वाशे वर्षे जुने इंग्रजांनी उभे केलेले पुरालेखागार अर्थात पेशवे दफ्तर आहे. इंग्रजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी ही अत्यंत देखणी इमारत बांधून या कागदपत्रांचे जतन केले. मात्र, आता ही वास्तू व त्यातील अनमोल ठेवा जणू काळ्या कोठडीची शिक्षाच भोगत असल्याचे चित्र आहे. याचे नीट जतन व संवर्धन केले, तर त्यातून मराठेशाहीचा देदीप्यमान इतिहास नव्या पिढीसमोर येऊ शकतो. मात्र, इथे जिज्ञासूंना कोणतीही माहिती मिळत नाही. अनेक खेटे मारल्यावर किंवा माहिती अधिकारात माहिती मागितली, तर जीर्ण कागदांतून अर्धवट माहिती दिली जाते.
टीम 'पुढारी'ने त्या ठिकाणी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले असता अनेक बाबी समोर आल्या. इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केल्यानंतर साम्राज्यासह दप्तरावर कब्जा मिळविला. याचदरम्यान पेशव्यांचे दफ्तर असलेल्या शनिवारवाड्यातील इमारतीला आग लागली. त्यानंतर हे दफ्तर चिंतोपंत देशमुख यांच्या आदेशाने गोविंदराव काळे व बाबाजी नाईक यांच्या घरी हलविले. ब्रिटिश अंमल सुुरू होईपर्यंत हे दफ्तर अस्ताव्यस्त अवस्थेत होते. नंतर ब्रिटिश अधिकारी माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांच्या आदेशाने खासगीवाले यांच्या वाड्यात हलविण्यात आले.
नंतर ते नाना फडणीस यांच्या वाड्यात आणले गेले. 7 जुलै 1877 मध्ये इंग्रजांनी या दफ्तरासाठी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. 1880 मध्ये या इमारतीसाठी 1 लाख 12 हजार 139 इतका खर्चाचा अंदाज करण्यात आला. आग टाळण्यासाठी दगडी इमारत बांधण्यात आली. त्या वेळी त्या ठिकाणी इमारतीच्या मध्यभागी आगीपासून वाचण्यासाठी 90 फूट उंचीवर पाण्याची टाकी बांधण्यात आली. ही इमारत आजही सुस्थितीत असली, तरी दफ्तराची मात्र या ठिकाणी हेळसांड होत आहे.
कागदपत्रे झाली जीर्ण…
टीम 'पुढारी'ने या कार्यालयात तीनवेळा जाऊन पाहणी केली असता असे लक्षात आले की, खालच्या मजल्यावरील दहा दगडी खोल्यांच्या अंधार कोठडीत ही कागदपत्रे शेवटच्या घटका मोजत आहेत. आधुनिक पद्धतीनुसार त्यांचे जतन करण्यासाठी मनुष्यबळ व अद्ययावत सुविधांची येथे वानवाच आहे. मुख्य पदावर इतिहास संशोधक व्यक्ती नसून एका लेखा अधिकार्याकडे सहायक संचालकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या कागदपत्रांची जाण त्यांना तोकडीच वाटली. वारंवार पाठपुरावा करूनही दफ्तरातील दुर्मीळ कागदपत्रांची माहिती त्यांना देता आली नाही. कुठल्या कागदपत्रांत काय आहे, हेदेखील सांगण्याचे त्यांनी टाळले.
कागदपत्रे जतनाचे काम संथ गतीने…
या ठिकाणी सर्व कर्मचारी चतुर्थ व तृतीय श्रेणीतील आहेत. त्यांना कुठलेही कागदपत्र हाताळण्याचे प्रशिक्षण नाही. खालच्या मजल्यावर चतुर्थ श्रेणी वर्गाचे कर्मचारी कागदपत्रे हाताळून गठ्ठे कापडात बांधत होते, तर वरच्या मजल्यावर कागदपत्रांचे धुळीने माखलेले गठ्ठे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. तेथेच बाजूला एका दालनात कागदपत्रे जतन करण्याचे काम सुरू आहे. तेथे पूर्वी 5 कर्मचारी होते. आता दोनच कर्मचारी काम करीत आहेत. जपान येथून मागविलेल्या टिश्यू पेपरवर सरसूल पावडर पाण्यात उकळून त्याचा लेप लावून कागदपत्रे जतन केली जात आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांत चार कोटी कागदपत्रांपैकी अवघ्या साठ लाख कागदपत्रांचे जतन करण्यात आले आहे. त्यांच्या डिजिटायझेशनचे कामही 'आउटसोर्सिंग'ने केले जात आहे. त्याची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
'तुम्ही मुंबईत या; मग माहिती देतो…'
खालच्या मजल्यावर दहा खोल्या आहेत. त्या ठिकाणी सर्वत्र अंधार असून, व्हरांड्यात उघड्यावर दुर्मीळ कागदपत्रांचे गठ्ठे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कागदपत्रांची हाताळणी कर्मचारी अत्यंत बेजाबदारपणे करताना दिसले. या सर्व कर्मचार्यांना शास्त्रीय पद्धतीने कागदपत्रे हाताळणीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. पेशवे दफ्तरातील सर्वच कागदपत्रे मोडी लिपी व इंग्रजीत आहेत. त्याचा अर्थबोधही येथील कर्मचार्यांना होत नाही. इतके दुर्मीळ पुरालेखागार पुण्यात असून, त्याचे मुख्यालय मुंबईत आहे. संचालकपदावर बसलेले सुजितकुमार उगले म्हणाले की, तुम्ही मुंबईत या, तेव्हाच तुम्हाला माहिती देतो.
मी मुंबईला असतो. स्थानिक कर्मचार्यांकडून माहिती देता येणार नाही. अधिक माहिती हवी असेल, तर मुंबईला यावे लागेल. शासनाने या पुरालेखागारासाठी तीनदा भरीव निधी दिला आहे. याउपर मी काही बोलू शकत नाही.
– सुजितकुमार उगले, संचालक, पेशवे दफ्तर, पुणे लेखागार