नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नीचांकी लाभांश वाटपामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. या वर्षी 8 टक्के दराने लाभांश वाटप करण्यात आला, तर पतसंस्थेला 2,36,5180 रुपयांचा नफा प्राप्त झाल्याचे वैजयंता कुंजीर यांनी सांगितले. ही सभा गदारोळात पार पडली. सासवड (ता. पुरंदर) येथे पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच, सर्वसाधारण सभेपुढे ठेवलेले 16 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. पुरंदर शिक्षक पतसंस्थेचा लाभांश 8 टक्के करण्यात आल्याने मागील कार्यकारिणीच्या कालावधीत 22, 55, 756 रुपये प्रतिमहिना नफा होता, तर चालू कार्यकारिणीच्या कार्यकाळत 11,01,126 रुपये प्रतिमहिना नफा आहे. नाकर्तेपणामुळे 50 टक्के नफा घटला. त्यामुळे 1.5 टक्के लाभांश कमी मिळाला. सभासदहितासाठी कर्जाचा व्याजदर नऊ टक्के करावा, अशी आग्रही मागणी माजी सभापती सुनील लोणकर यांनी केली. या वेळी सभापती वैजंता कुंजीर, उपसभापती गोरक्षनाथ चव्हाण, सचिव सुधीर मेमाणे, राजेंद्र कुंजीर, दत्तात्रय फरतडे, शरद पवार, संतोष कुंजीर, चंद्रकांत जगताप आदी उपस्थित होते.