पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने भूसंपादन सुरळीत

पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने भूसंपादन सुरळीत
Published on
Updated on

नायगाव; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे विमानतळासाठी समृध्दी महामार्गाप्रमाणे जमीन संपादनाचे धोरण ठरविण्यात येईल, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेने पुरंदर तालुका आणि लगतच्या अनेक तालुक्यांच्या विकासाचा मोठा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजारपणातही माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. पुरंदरच्या या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाने राजकीय हस्तक्षेप व शेतकर्‍यांच्या विरोधामुळे अनेक घिरट्या घेतल्या आहेत.

समृद्धी मार्गाच्या धर्तीवर विमानतळाच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावू, या मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी (दि. 2) सासवड (ता. पुरंदर) येथील जाहीर सभेत केलेल्या प्रकल्पाला गती मिळेल, असे चित्र निर्माण झाल्याने प्रकल्प समर्थक खूष झाले आहेत. पारगाव मेमाणे वगळून इतर जागेत विमानतळ करण्याचे शिंदे सरकारच्या विचाराधीन आहे. अगोदरच्या जागेपेक्षा कमी जागेत यामुळे विमानतळ बसणार आहे. यापूर्वी जागेचा मोबदला अगोदर जाहीर न झाल्याने अडचणींचा सामना करावा लागला होता. आता शिंदे-फडणवीस सरकार समृध्दी महामार्गाप्रमाणे अगोदर मोबदला जाहीर करणार का? हे पाहावे लागणार आहे.

पुणे येथील विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर शासनाकडून विमानतळासाठी नवीन जागेची शोधाशोध सुरू झाली. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याच्या विकासाला 'बूस्ट' मिळेल, हे लक्षात घेऊन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात पुरंदर तालुक्याचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला. तालुक्यातील चार जागांची पाहणी झाली. सुरुवातीला वाघापूरपासून पूर्वेकडील जागेची पाहणी झाली. येथील ग्रामस्थांचा विरोध पाहता लगेच पारगाव मेमाणे, एखतपूर-मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी, वनपुरी येथील जागा सुचविण्यात आली. या जागेला 'एअरपोर्ट अथॉरिटी'ने हिरवा कंदील दाखविला.

शासनाकडून या ठिकाणच्या सर्वेक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली. पारगाव परिसरातील शेतकर्‍यांचा विरोध पाहता विद्यमान आमदार संजय जगताप यांनी विमानतळासाठी नायगाव परिसरातील जागा सुचविली. त्या जागेला 'एअरपोर्ट अथॉरिटी'ने नकार दिला. या ठिकाणी देखील स्थानिक शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. पुढे विमानतळावरून फायद्याचे राजकारण जुळविण्याच्या ओघात विमानतळ पुरंदर-बारामतीच्या हद्दीवर फेकले गेले.

अशा अनेक घिरट्या घेत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 'टेकऑफ' बदलून बारामती, दौंड, पुरंदर या तीन तालुक्यांच्या हद्दीवर अदानी ग्रुपचे खासगी विमानतळ उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच आणि विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असल्याने पुन्हा सुरुवातीच्या पारगाव-मेमाणेवगळून एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी, वनपुरी या जागेत विमानतळ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news