पुनावळे कचरा डेपो सात वर्षांपासून कागदावरच

पुनावळे कचरा डेपो सात वर्षांपासून कागदावरच
Published on
Updated on

दीपेश सुराणा

पिंपरी :  पुनावळे कचरा डेपोसाठी आवश्यक जागेचा ताबा न मिळाल्याने येथील कचरा डेपो कागदावरच राहिला आहे. गेल्या सात वर्षांपूर्वी या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. मात्र, सात वर्षांचा काळ उलटल्यानंतरही याबाबत केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम झाले आहे. या प्रकल्पाला स्थानिक रहिवासी व नगरसेवकांनी देखील विरोध केलेला आहे.

शहरामध्ये सध्या दररोज 1000 ते 1050 मेट्रिक टन इतका घनकचरा निर्माण होतो. मोशी येथील कचरा डेपोमध्ये सध्या या कचर्‍यावर प्रक्रिया केली जात आहे. येथील कचरा डेपोमध्ये यांत्रिकी खत निर्मिती प्रकल्पात 500 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येते.
प्लास्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्पात 5 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जात आहे. तर, मटेरियल रिकव्हरी सुविधेमध्ये 1 हजार मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची सुविधा आहे. त्याशिवाय, कचर्‍यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम सध्या सुरु आहे. त्या माध्यमातून 700 मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया होऊ शकणार आहे.

शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखांवर जाऊन पोहचली आहे. दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍यात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत मोशी येथील कचरा डेपो अपुरा पडणार आहे. त्यामुळे पुनावळे येथील कचरा डेपोची जागा ताब्यात घेऊन तेथे कचरा डेपो सुरू केल्यास शहराची भविष्यातील कचरा समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

पुनावळे कचरा डेपोसाठी जागेचा ताबा कधी?
पुनावळे कचरा डेपोसाठी आरक्षित असलेली 22.80 हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. तर, खासगी 3 हेक्टर जागेवर देखील हे आरक्षण आहे. पुनावळेतील जागेच्या मोबदल्यात वन विभागाने पर्यायी जागेची मागणी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार त्यांना पिंपरीतील जागा सुचविण्यात आली. ही जागा स्वीकारण्यास ते सुरुवातीला तयार झाले होते. मात्र, त्यांनी ही जागा वनीकरणासाठी अनुकूल नसल्याचे कळवत नवीन पर्यायी जागेची मागणी केली आहे.

 

पुनावळे कचरा डेपोसाठी हव्या असलेल्या जागेच्या मोबदल्यात वन विभागाला पर्यायी जागा द्यावी लागणार आहे. अशी पर्यायी जागा सुचविण्याबाबत महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांकडे पत्रव्यवहार करून विचारणा केली आहे. तसेच, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य वनसंरक्षक यांची एकत्रित बैठक लावण्याची देखील मागणी केली आहे.
– प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना विभाग, महापालिका

 

शहरात दररोज निर्माण होणारा कचरा लक्षात घेता महापालिकेला सध्या उपलब्ध असलेली मोशी कचरा डेपोची जागा पुरेशी नाही. त्यासाठी पुनावळे येथील प्रस्तावित जागा देखील मिळणे गरजेचे आहे.
– संजय कुलकर्णी,
सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news